भारताच्या सत्यार्थींना नोबेल
By admin | Published: October 11, 2014 06:24 AM2014-10-11T06:24:40+5:302014-10-11T06:24:40+5:30
या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे.
ओस्लो : गेल्या तीन दशकांहून जास्त काळ बालहक्क संरक्षणासाठी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झटणारे गांधीवादाचे पाईक कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानातील तालिबानी हल्ल्यातून बचावल्यानंतर बालहक्क आणि मुलींच्या शिक्षणाला वाहून घेणारी मलाला युसूफझई यांना शांततेसाठीचा २०१४चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या वाट्याला एकाचवेळी हा सन्मान आला आहे. साठीच्या घरातील सत्यार्थी हे सर्वार्थाने भारतीय असलेले शांततेच्या नोबेलचे पहिले मानकरी, तर १७ वर्षांची मलाला या पुरस्काराची सर्वात लहान मानकरी ठरली आहे.
या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे. भारतीय उपखंडात या दोघांनी बालहक्क व मुलांचे शिक्षण यासाठी केलेल्या कार्याबद्दल ही निवड झाली. सत्यार्थी यांनी भारतात मुलांची बालमजुरी व तस्करी यातून सुटका करण्यासाठी एनजीओ स्थापन केली व त्यासाठी विद्युत अभियंत्याची नोकरीही सोडून दिली. तर मलाला तालिबानने दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावली. मुलींच्या शिक्षणसाठी काम करण्याचा तिचा निर्धार आजही कायम आहे. सत्यार्थी यांच्या एनजीओने ८० हजार मुलांची बालमजुरीतून मुक्तता केली आहे. मुले व युवक यांची अत्याचारातून मुक्तता करण्यास तसेच मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अखंड परिश्रम करणारे सत्यार्थी व मलाला यांची निवड २०१४च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी करण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला आहे, असे ज्युरींनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यार्थी व मलाला यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले.