सामाजिक संस्थांचे महत्त्व सांगणाऱ्यांना नोबेल; अर्थशास्त्रासाठी डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:15 PM2024-10-15T15:15:12+5:302024-10-15T15:15:26+5:30
देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व या तिघांनी आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने म्हटले आहे.
स्टॉकहोम : कमकुवत कायदे असलेली शासनव्यवस्था व शोषण करणाऱ्या संस्थांमुळे शाश्वत विकास का होत नाही, याबद्दल केलेल्या संशोधनासाठी डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन या तीन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रासाठी देण्यात येणारे यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नोबेल समितीने ही घोषणा सोमवारी केली.
देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व या तिघांनी आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने म्हटले आहे. एसेमोग्लू आणि जॉन्सन हे दोघेजण मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत आहेत आणि रॉबिन्सन शिकागो विद्यापीठात संशोधन करतात.
अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष जेकोब स्वेन्सन यांनी सांगितले की, देशांमधील उत्पन्नातील प्रचंड तफावत कमी करणे हे सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. ते कसे साध्य करता येईल, हे या तीन अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिले आहे. मात्र, हे काम करण्यात देश यशस्वी किंवा अयशस्वी का होतात, याची मूळ कारणे त्यांनी शोधून काढली आहेत.
डॅरॉन एसेमोग्लू : तुर्कस्थानमध्ये जन्म. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत आहेत. ते म्हणाले, लोकशाही संस्थांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. चीनसारख्या हुकूमशाही देशांना शाश्वत विकास करण्यास वेळ लागेल, असे मला वाटते.
सायमन जॉन्सन : ब्रिटिश अमेरिकन अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९६३ रोजी झाला. ते एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक आहेत. तसेच जॉन्सन पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये वरिष्ठ फेलो आहेत.
जेम्स ए. राॅबिन्सन : अर्थतज्ज्ञ व राजकीय घडामोडींचे अभ्यासक. जन्म १९६० साली झाला. ते ब्रिटिश अर्थतज्ज्ञ व राजकीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. ते सध्या रेव्हरंड डॉ. रिचर्ड एल. ग्लोबल कॉन्फ्लिक्ट स्टडीज या संस्थेत प्राध्यापक आहेत.