ज्यांच्या संशोधनामुळे कोरोनात वाचला लाखोंचा जीव, त्यांना नोबेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:09 AM2023-10-03T05:09:36+5:302023-10-03T05:09:55+5:30
कॅटालिन कारिको, ड्र्यू वाइसमन यांचा वैद्यकशास्त्रासाठी सन्मान
स्टॉकहोम : कोरोना आजारावर प्रभावी उपचारांसाठी एमआरएनए लस बनविण्याकरिता ज्यांचे संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरले, अशा कॅटालिन कारिको व ड्र्यू वाइसमन या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
कॅटालिन कारिको हंगेरीतील सागन विद्यापीठात प्राध्यापक आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर ड्र्यू वाइसमन यांनी एमआरएनएबाबत कॅटालिन कारिको यांच्यासोबत संशोधन केले होते. यंदा नोबेल पुरस्काराची रक्कम १ कोटी १० लाख स्वीडिश क्रोनर करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
पुढील घोषणा कधी?
भौतिकशास्त्र मंगळवार
रसायनशास्त्र बुधवार
साहित्य गुरुवार
शांतता शुक्रवार
अर्थशास्त्र सोमवार
नेमकी कशी मदत?
नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे की, एमआरएनएची शरीरातील रोगप्रतिकारशक्तीशी जी प्रक्रिया होते, त्याबद्दल आजवर जो समज होता त्यात कॅटालिन कारिको व ड्र्यू वाइसमन यांच्या संशोधनामुळे आमूलाग्र बदल झाला. या संशोधनामुळे कोरोना आजारावर लस तयार करण्यास मोठी मदत झाली.
अनुवांशिक कोडमधील घटक असलेला एमआरएनए व प्रतिकारशक्ती यांच्यामध्ये होणाऱ्या प्रक्रियेवर त्यांनी केलेल्या संशोधनामुळे एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित लस बनविणे शक्य झाले.
या दोन शास्त्रज्ञांनी एमआरएनए तंत्रज्ञान जगाला प्रदान केले, असे गौरवाने म्हटले जाते.