कॉन्ट्रॅक्ट थिअरी मांडणाऱ्या दोघांना अर्थशास्त्राचे नोबेल
By admin | Published: October 11, 2016 04:56 AM2016-10-11T04:56:49+5:302016-10-11T04:56:49+5:30
जन्माने ब्रिटिश असलेले आॅलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंग्ट होमस्ट्रॉम या दोन अर्थतज्ज्ञांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर
स्टॉकहोम : जन्माने ब्रिटिश असलेले आॅलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंग्ट होमस्ट्रॉम या दोन अर्थतज्ज्ञांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला.
‘कॉन्ट्रॅक्ट थिअरी’ या अर्थशास्त्रीय सैधांतिक मांडणीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कंत्राट केल्याने लोक परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये कसा मेळ घालू शकतात, याचे विवेचन या दोघांनी आपल्या सिद्धांताद्वारे केले. पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्विडिश अकादमी आॅफ सायन्सेस’ने पुरस्कार जाहीर करताना नमूद केले की, हार्ट आणि होमस्ट्रॉम यांनी विकसित केलेला सिद्धांत वास्तव जिवनातील व कंपन्यांमधील कंत्रांटांमधील गुंतागुंत व ती करत असताना येणाऱ्या अडचणींचा उलगडा करतो. उदा. ‘कॉन्ट्रॅक्ट थिअरी’चा उपयोग करून आपण कंपन्यांच्या सीईओंना द्यायच्या कामगिरीवर आधारित दिल्या जाणाऱ्या पगाराचे विश्लेषण करू शकतो. विम्यासाठीचा सह-मेहतानाही ठरवू शकतो. हा पुरस्कार आठ दशलक्ष क्रोनर म्हणजे सुमारे ९.३० लाख डॉलरचा आहे. (वृत्तसंस्था)