परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
By admin | Published: April 9, 2016 05:19 PM2016-04-09T17:19:39+5:302016-04-09T17:19:39+5:30
2007मध्ये न्यायाधीशांना ताब्यात घेतल्या प्रकरणी सुनावणीला न्यायालयात हजेरी न लावल्याने परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद. दि ९ - दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढला आहे. 2007मध्ये न्यायाधीशांना ताब्यात घेतल्या प्रकरणी सुनावणीला न्यायालयात हजेरी न लावल्याने परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात हा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परदेशी जाण्यावरील निर्बंध हटवल्यानंतर परवेझ मुशर्रफ गेल्या महिन्यात उपचारासाठी दुबईला निघून गेले होते.
न्यायाधीश सोहेल अक्रम यांनी परवेझ मुशर्रफ यांच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करत परदेशी दुबईला जाण्याअगोदर त्यांनी न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे अध्यक्ष असताना २००७ मध्ये मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लादली होती. त्यावेळी त्यांनी न्यायाधीशांना ताब्यात घेतलं होतं त्याचप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आपलं मत मांडलं. यानंतर न्यायाधीशांनी परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला.
याअगोदरही मुशर्ऱफ यांना अनेकवेळी वेगवेगळ्या न्यायालयांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सुरक्षा तसंच तब्बेतीची कारणे देत त्यांनी उपस्थित राहणं टाळलं होतं. याच दहशतवादविरोधी न्यायालयाने गेल्या सप्टेंबर महिन्यात मुशर्रफ यांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मुशर्ऱफ यांनी हजर राहण्यास नकार देत आपण आजारी असल्याचं कारण सांगत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं होतं.