अमेरिकन नागरिकांचा असहकार, संसर्गाची माहिती देण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 03:55 IST2020-06-23T03:54:38+5:302020-06-23T03:55:03+5:30
अमेरिकन प्रशासनाने दोन आठवड्यांत ५ हजार ३४७ रुग्ण वा रुग्ण असण्याची शक्यता असलेले लोक यांच्याकडून विविध माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकन नागरिकांचा असहकार, संसर्गाची माहिती देण्यास टाळाटाळ
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या ज्या न्यूयॉर्क शहरात आणि आसपासच्या परिसरात ‘कोविड-१९’चा सर्वाधिक संसर्ग झाला आहे, तेथील लोक आपल्या आजाराची माहितीच प्रशासनाला द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संसर्गाला आळा घालण्यात अडचणी येत आहे.
लोक आजारांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहेत. अमेरिकन प्रशासनाने दोन आठवड्यांत ५ हजार ३४७ रुग्ण वा रुग्ण असण्याची शक्यता असलेले लोक यांच्याकडून विविध माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात केवळ ३५ टक्के लोकांनी ते कोणाकोणाला भेटले होते, त्यांची नावे काय आहेत, ते कुठे राहतात, याची माहिती प्रशासनाला दिली. म्हणजेच तब्बल ६५ टक्के लोकांनी नीट माहिती देण्यास नकार दिला, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात नमूद केले आहे.
केवळ ३५ टक्के लोकांनीच माहिती देणे, ही बाब चिंताजनक आहे. इतक्या अपुऱ्या माहितीतून संसर्ग कोणामुळे झाला असेल, हे समजणे अशक्य असते, असे तेथील तज्ज्ञांनी म्हटले आहे. सर्वांत जास्त संसर्ग जेथे झाला, तेथील लोकांनी सर्व माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे संसर्गाची ठिकाणे समजू शकतील आणि फैलाव थांबवण्यासाठी उपाय योजता येतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत निराशा हाती लागत आहे. (वृत्तसंस्था)
>अनलॉकची प्रक्रिया सुरू
न्यूयॉर्कमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. अनलॉकच्या दुसºया टप्प्यात किमान ३ लाख लोक आपापल्या कार्यालयांत नोकरीसाठी जातील, अशी अपेक्षा असल्याचे न्यूयॉर्कच्या महापौरांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये संसर्गाचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. शनिवारी शहरात संसर्गामुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंतचा हा सर्वात कमी आकडा आहे, असे सांगण्यात आले.