अण्वस्त्र तंत्रज्ञान चोरांमुळे अण्वस्त्रांना धोका
By admin | Published: April 2, 2016 03:49 AM2016-04-02T03:49:51+5:302016-04-02T03:49:51+5:30
अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान चोरट्या मार्गांनी वाहतूक करणारे आणि दहशतवाद्यांशी हात मिळविणाऱ्या देशांमुळे आज अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेला सगळ्यात मोठा धोका निर्माण केला आहे
वॉशिंग्टन : अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान चोरट्या मार्गांनी वाहतूक करणारे आणि दहशतवाद्यांशी हात मिळविणाऱ्या देशांमुळे आज अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेला सगळ्यात मोठा धोका निर्माण केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दोन दिवसांच्या अण्वस्त्र सुरक्षा शिखर परिषदेनिमित्त व्हॉईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या भोजन समारंभात ते बोलत होते.
ब्रसेल्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की,‘‘दहशतवादापासून अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेला किती खरा आणि तोंडासमोर उभा ठाकलेला धोका आहे हेच दाखवून दिले. या संदर्भात सगळ्या देशांनी आपापल्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे पालन करावे.’’
दहशतवादाचे जाळे जगभर पसरलेले असताना आम्ही देशपातळीवरच कृती करीत आहोत, असे मोदी म्हणाले.
या समारंभात मोदी ओबामा यांच्या शेजारी बसले होते. यावेळी अण्वस्त्रे सुरक्षा शिखर परिषदेसाठी आलेले २० पेक्षा जास्त देशांचे प्रमुखही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
काश्मिरी फुटीरवाद्यांची निदर्शने
अण्वस्त्र सुरक्षा शिखर परिषदेच्या जवळ फुटीरवादी काश्मीर गटांनी निदर्शने केली. काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करावा, अशी त्यांची मागणी होती. निदर्शनांचे नेतृत्व वर्ल्ड काश्मीर अवेअरनेसचे सरचिटणीस गुलाम नबी फई यांनी केले. पाकच्या गुप्तचर संघटनेसाठी काम केल्याच्या आरोपावरून फई यांना अमेरिकेत दोन वर्षे तुरुंगवासात काढावी लागली होती.
पाकचा अणुकार्यक्रम अपघातमुक्त- चौधरी
वॉशिंग्टन : अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेबद्दल जगभर चिंता व्यक्त होत असताना पाकिस्तानने त्याचा ‘साधा’ अणुकार्यक्रम हा अपघातमुक्त असल्याचा दावा केला. भारताचा मात्र तसा नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे.
अण्वस्त्र सुरक्षा शिखर परिषदेला उपस्थित असलेले परराष्ट्र सचिव ऐझाझ चौधरी यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने (आयएईए) जगभर २,७३४ अणुअपघात झाल्याची नोंद केली आहे. त्यात पाच भारतातील अपघातांचाही समावेश आहे व पाकिस्तानात एकही अपघात घडलेला नाही.