दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 04:49 PM2018-04-20T16:49:15+5:302018-04-20T16:49:15+5:30
दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना करण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
सेऊल- दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना करण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळेच या टेलिफोन हॉटलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या सेऊल येथील ब्लू हाऊस या निवासस्थानातून उत्तर कोरियामध्ये स्टेट अफेअर्स कमिशनमध्ये एक फोन करून या हॉटलाइनची चाचणी करण्यात आली. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम येथे भेटणार आहेत. त्याआधी उ. कोरियाचे किम जोंग उन आणि द. कोरियाचे मून जाए-इन फोनवर चर्चा करतील. त्यांच्या भेटीनंतरही ही हॉटलाइन कायम ठेवली जाणार असून दोन्ही देशातील तणावाची स्थिती कमी करण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी तिचा कायम उपयोग करण्यात येईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चाचणीचा फोन कॉल 4 मिनिटे 19 सेकंदांचा होता. दोन्ही बाजूचे नेते या कॉलमध्ये एकमेकांशी बोलले. हा फोन अत्यंत चांगल्याप्रकारे झाला असून आवाजाची गुणवत्ताही चांगली होती. जणू शेजारी फोन करावा इतक्या सहजपणाने त्यावर बोलणं होत होतं.
या दोन्ही देशांमध्य़े चर्चा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 1950-53 पासून अशी चर्चा फक्त तिसऱ्यांदा होत आहे. त्याचप्रमाणे डोनल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यामध्ये मे किंवा जून महिन्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.