'या' शहरात राहतात केवळ 4 लोक, दुपटीने वाढूनही लोकसंख्या कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:52 AM2018-09-05T09:52:43+5:302018-09-05T09:52:57+5:30
या शहराचा कारभार 86 वर्षांचे ब्रूस लोरेन्झ पाहात होते. नुकतेच त्यांचे निधन झाले.
नॉर्थ डाकोटा- तुम्ही कमी लोकसंख्येचे देश, राज्यं, शहरं, गावं पाहिली असतील, त्यांच्याबद्दल ऐकलंही असेल. पण अमेरिकेतल्या एका शहरात लोकसंख्या अगदीच कमी आहे. नॉर्थ डाकोटा राज्यातील एका शहराची लोकसंख्या दुपटीने वाढून 4 होणार आहे.
या शहराचे नाव आहे रुसो. या शहराच्या महापौरांचे नुकतेच निधन झाल्यामुळे शहराची लोकसंख्या 2 एवढीच उरली होती. नॉर्थ डाकोटा राज्याच्या नियमानुसार शहराचा दर्जा मिळण्यासाठी 3 नागरिक तेथे राहाणे गरजेचे असते. त्यामुळेच दोन व्यक्तींचा समावेश करुन या शहराची लोकसंख्या वाढवण्यात येणार आहे. या शहराला मॅकलीन कौंटी कम्युनिटी ऑफ रुसो असे नाव होते. त्यांना आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी लोकसंख्या वाढवावी लागणार आहे. या शहराचा कारभार 86 वर्षांचे ब्रूस लोरेन्झ पाहात होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यामुळे लॉरिन्डा रोलोसन आणि टेरी लोरोसन हे दाम्पत्यच फक्त नागरिक म्हणून शिल्लक राहिलं.
आता ग्रेग श्नाल्ट्झ आणि त्यांची पत्नी मिशेल यांना या शहराचे सदस्यत्व देण्यात येणार आहे. त्यांच्यापैकी ग्रेग हे शहराचे नवे महापौर होतील. ते सध्या वेल्वा येथे राहातात. रुसोमध्ये त्यांच्या नव्या घराचं बांधकाम सुरु आहे. ते पूर्ण झाल्यावर नवे महापौर शहरात राहाण्यासाठी येतील. रुसो शहराची स्थापना 1909मध्ये झाली. त्यावेळेस त्याची लोकसंख्या 141 इतकी होती. मात्र हळूहळू शहराची लोकसंख्या कमी होत गेली.