किम जोंगचं टेन्शन वाढलं! कोरोना पाठोपाठ उत्तर कोरियात नव्या आजाराचे थैमान; पाठवली औषधं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 11:08 AM2022-06-16T11:08:08+5:302022-06-16T11:10:01+5:30
North Korea : एका आजाराने थैमान घातले आहे. अनेक भागात हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून उत्तर कोरिया कोरोना व्हायरसशी झुंज देत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. असं असताना आता पुन्हा एकदा किम जोंग उन यांचं टेन्शन वाढलं आहे. देशात आणखी एका आजाराने थैमान घातले आहे. अनेक भागात हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढल्याचं म्हटलं जात आहे.
सरकारी मीडिया केसीएननुसार, उत्तर कोरियाचेकिम जोंग उन यांनी बुधवारी पश्चिमेकडील बंदरगाह शहरात हेजू येथील पीडित रुग्णांच्या मदतीसाठी औषधे पाठवली आहेत. या आजाराने बाधित लोकांच्या संख्येबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र हा आजार गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजेच हा एक पचनाचा आजार आहे.
किम जोंग उनचं टेन्शन वाढलं
केसीएनएनुसार, किम जोंग उन यांनी महामारी लवकरात लवकर रोखण्याच्या गरजेवर भर दिला आहे. अशा परिस्थितीत संशयित रुग्णांना तातडीने क्वारंटाईन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गेल्या महिन्यातच उत्तर कोरियामध्ये कोरोनामुळे इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती. देशात आधीच कोरोनाशी लढण्यासाठी औषध आणि लसींचा मोठा तुटवडा आहे.
रुग्णांच्य़ा संख्येत सातत्याने वाढ
उत्तर कोरियामध्ये गुरुवारी तापाची लक्षणे असलेल्या आणखी 26,011 लोकांची नोंद झाली. एप्रिलच्या अखेरीपासून, देशभरात तापाच्या रुग्णांची एकूण संख्या 4.56 मिलियन इतकी नोंदली गेली आहे. तर आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्योंगयांग दररोज तापाच्या रुग्णांची संख्या जाहीर करत आहे. येथे कोरोना चाचणी किटचा मोठा तुटवडा असल्याचं म्हटलं जात आहे. सरकार-नियंत्रित माध्यमांद्वारे जारी केलेल्या आकडेवारीच्या कमी-रिपोर्टिंगचाही तज्ञांना संशय आहे. उत्तर कोरियाने म्हटले आहे की कोरोनाची लाट कमी होत आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने या महिन्याच्या सुरुवातीला प्योंगयांगच्या दाव्यांवर संशय व्यक्त केला आणि तेथे परिस्थिती आणखीनच बिकट होत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.