उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागले, दक्षिण कोरियाच्या सैन्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:59 PM2022-05-04T12:59:02+5:302022-05-04T13:01:14+5:30
North Korea Blast a Missile: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा थेट धमकी दिली आहे की, गरज पडल्यास कधीही ते आण्विक शस्त्रांचा वापर करू शकतात.
उत्तर कोरियाने पूर्वेकडील अज्ञात परिसराला लक्ष्य करत पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागले, असा दावा दक्षिण कोरियाच्या सैन्याने केला आहे. उत्तर कोरियाने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, असा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. यासंदर्भात दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा थेट धमकी दिली आहे की, गरज पडल्यास कधीही ते आण्विक शस्त्रांचा वापर करू शकतात. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाने आता क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दक्षिण कोरिया संतापला आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका नवीन टेक्टिकल गाइडेड शस्त्राची चाचणी केली होती. ही चाचणी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यातील सरावादरम्यान झाली होती. तसेच, उत्तर कोरियाकडून या चाचणी संदर्भातील फोटो सुद्धा जारी करण्यात आले होते.
North Korea has fired an 'unidentified projectile' eastward, reports AFP quoting South Korea's military
— ANI (@ANI) May 4, 2022
१३ वेळा क्षेपणास्त्रांची चाचणी
उत्तर कोरियाने यावर्षी आतापर्यंत १३ वेळा क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. या चाचणीत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचा सुद्धा समावेश आहे. यासंबंधी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निर्बंधांमध्ये सवलत आणि इतर सवलती मिळण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणण्याच्या उद्देशाने उत्तर कोरिया सातत्याने शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे.