उत्तर कोरियानं पुन्हा डागल्या दोन मिसाइल, दक्षिण कोरियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 09:18 AM2019-07-25T09:18:45+5:302019-07-25T09:21:56+5:30
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा दोन छोट्या टप्प्यातील मिसाइल समुद्रात डागल्याचा दावा दक्षिण कोरियानं केला आहे.
सेऊलः उत्तर कोरियानं पुन्हा एकदा दोन छोट्या टप्प्यातील मिसाइल समुद्रात डागल्याचा दावा दक्षिण कोरियानं केला आहे. दक्षिण कोरियाचे संयुक्त चीफ ऑफ स्टाफनं सांगितलं की, उत्तर पूर्व किनाऱ्यावरील 430 किलोमीटर (270 मैल) उड्डाण भरल्यानंतर त्या मिसाइल समुद्रात कोसळल्या. या मिसाइलनं 50 किलोमीटर (30 मैल) अधिक उंचावरून उ्डडाण भरलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोरिया आणि अमेरिकेनं कोरियन द्वीपकल्पात सैन्य अभ्यास वाढवला होता. त्याच पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवण्यासाठी उत्तर कोरियानं या मिसाइल डागल्याची आता चर्चा आहे.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण प्योंगान प्रांतातील प्यांगयांगपासून पूर्वेच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. अमेरिकी सैन्यानंही या वृत्ताला दुजोरा दिला होता. दरम्यान, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी ही संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेनं सांगितलं होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, 'या प्रकरणात आपण लक्ष घालू,' असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. तर दुसरीकडे अवघा अमेरिका आमच्या निशाण्यावर आला असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली होती.
‘वा-साँग-15’ या नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाचे हे धाडस हा जगाच्या दृष्टीने धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटल्या आहेत. 4474 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून 950 किमी जपानजवळ समुद्रात पडले होते. अमेरिकेत कोठेही हल्ला करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे उत्तर कोरियाचे पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे, असे उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांनी मोठ्या गर्वाने म्हटले होते.