उत्तर कोरियाने जपानच्या दिशेनं डागले क्षेपणास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 07:59 AM2017-11-29T07:59:24+5:302017-11-29T12:56:08+5:30
उत्तर कोरियाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री (स्थानिक वेळेनुसार) जपान समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही उत्तर कोरियाकडून पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री (स्थानिक वेळेनुसार) जपान समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले आहे. अमेरिकन सरकारमधील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे क्षेपणास्त्र जपानवरुन किती दूर अंतरावर गेले हे मात्र समजू शकले नाही. किम जोंग उनच्या मनमानी कारभारामुळे अनेक देश चिंतेत आहेत. दरम्यान या संदर्भात जपानच्या पंतप्रधानांनी तातडीने कॅबिनेटची बैठक बोलाविली आहे.
दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण प्योंगान प्रांतातील प्यांगयांगपासून पूर्वेच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागण्यात आले. अमेरिकी सैन्यानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी ही संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी सांगितले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, 'या प्रकरणात आपण लक्ष घालू,' असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
दक्षिण कोरियाच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरिया 2018 पर्यंत आण्विक क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात सक्षम होईल. दरम्यान, दक्षिण कोरियादेखील आपली क्षेपणास्त्रांमध्ये चांगल्या पद्धतीनं सुधारणा करण्यास वारंवार चाचणी करत आहे. यापूर्वी दक्षिण कोरियाकडून 22 क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली आहे.
North Korea says it has successfully launched a new type of ICBM, what it calls the Hwasong 15, reports AP
— ANI (@ANI) November 29, 2017
North Korea missile launch is the highest yet, poses worldwide threat, US Defense Secretary Mattis says: AFP
— ANI (@ANI) November 28, 2017
सर्व पर्याय खुले - ट्रम्प
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी परखड शब्दात सर्व पर्याय हाताशी असल्याचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने केलेल्या दु:साहसातून काहीतरी गंभीर घडण्याचे संकेत मिळतात, असे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले होते. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टोनिओ गुटेरस यांनीही उत्तर कोरियाच्या या आगळिकीचा तीव्र धिक्कार केला होता.