अमेरिकेच्या धमकीला किम जोंग उनचा ठेंगा; एकापाठोपाठ एक डागली ८ क्षेपणास्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 05:23 PM2022-06-05T17:23:30+5:302022-06-05T17:24:18+5:30
अमेरिकेची विमानवाहू नौका रोनाल्ड रीगनने फिलीपीन समुद्रात दक्षिण कोरियासोबत तीन दिवसीय नौदल सराव पूर्ण केल्यानंतर एक दिवसाने ही चाचणी घेण्यात आली.
उत्तर कोरियाने रविवारी समुद्राच्या दिशेने आठ कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली. दक्षिण कोरियाची राजधानी प्योंगयांगजवळील सुनन भागातून ३५ मिनिटांपेक्षा जास्त काळ एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे डागण्यात आली अशी माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने क्षेपणास्त्रे किती अंतरावर पडली हे सांगितले नाही, परंतु उत्तर कोरियाकडून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने दक्षिण कोरियाच्या लष्कराने पाळत वाढवली आहे. अमेरिकेची विमानवाहू नौका रोनाल्ड रीगनने फिलीपीन समुद्रात दक्षिण कोरियासोबत तीन दिवसीय नौदल सराव पूर्ण केल्यानंतर एक दिवसाने ही चाचणी घेण्यात आली.
NSA सुरक्षेसंदर्भात बैठक घेणार
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांच्या कार्यालयाने सांगितले की, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) किम सुंग-हान चाचणीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलवतील. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी चाचणीबद्दल माहिती गोळा करण्यासाठी विमान आणि जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मात्र, नुकसानीचे तात्काळ वृत्त नाही.
'अमेरिकन सैनिकांना धोका नाही'
अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने म्हटले आहे की, त्यांना उत्तर कोरियाच्या अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांबद्दल माहिती आहे, परंतु यामुळे यूएस कर्मचार्यांना, प्रदेशाला किंवा आमच्या मित्र राष्ट्रांना तात्काळ धोका निर्माण झाला नाही.
अणुचाचणी केंद्र उभारण्याची तयारी सुरू
उत्तर कोरियाने २०२२ मध्ये केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या क्रमवारीतील ही १८वी चाचणी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या या कट्टरतेचा उद्देश अमेरिकेला आर्थिक आणि सुरक्षा सवलतींसाठी वाटाघाटी करण्यास भाग पाडणे आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरिया पुंग्ये-री या ईशान्येकडील शहरामध्ये आण्विक चाचणी केंद्रात अधिक तयारी करत असल्याची चिन्हे आहेत.
अमेरिकेचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचे उत्तर कोरियातील विशेष दूत सुंग किम यांनी शुक्रवारी सांगितले की, वॉशिंग्टन आपल्या आशियाई मित्र राष्ट्रांशी जवळून समन्वय साधून सर्व आपत्कालीन परिस्थितींसाठी तयारी करत आहे. उत्तर कोरियाने नवीन अण्वस्त्र चाचण्या घेतल्यास अमेरिकेने अतिरिक्त आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याचा आग्रह धरला आहे, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या हालचालीची शक्यता कमीच दिसत आहे.