Kim Jong Un: उत्तर कोरियाचा आता संपूर्ण जगावर ‘डोळा’, किम जोंग उनचे खतरनाक इरादे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 03:24 PM2023-04-19T15:24:21+5:302023-04-19T15:24:34+5:30
Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा आणखी एक धोकादायक डाव उघडकीस आला आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा आणखी एक धोकादायक डाव उघडकीस आला आहे. किम जोंगने सांगितले की, उत्तर कोरियाच्या पहिल्या लष्करी हेरगिरी उपग्रहाचं काम पूर्ण झालं आहे. तसेच अधिकाऱ्यांना निश्चित योजनेप्रमाणे त्याचे प्रक्षेपण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, मंगळवारी उत्तर कोरियाच्या एअरोस्पेस एजन्सीचा दौरा सुरी असताताना किमने सांगितले की, अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांपासून संरक्षणाला असलेल्या धोक्याचा विचार करून अंतराळावर आधारित टेहळणी प्रणाली मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
उत्तर कोरियाने सांगितलं की, त्यांनी अमेरिका आणि त्याचे प्रादेशिक सहकारी दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी अभ्यासाला प्रत्युत्तर म्हणून, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचाही समावेश आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेवर हल्ल्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे.
केसीएनएच्या म्हणण्यानुसार किमने राष्ट्रीय एअरोस्पेस विकास प्राधिकरणामध्ये सांगितले की, युद्ध थांबवण्यासाठी आपल्या पद्धतींचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी उत्तर कोरियाकडून लष्करी टेहळणी करणं महत्त्वपूर्ण आहे.
किम जोंग उनने सांगितले की, लष्करी टेहळणी उपग्रहाची बांधणी एप्रिल महिन्यात करण्यात आली आहे. त्याने आदेश दिले आहेत की, या प्रक्षेपणाशी संबंधित तयारीला अंतिम रूप देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. मात्र उपग्रह प्रक्षेपणाच्या तारखेबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.