उत्तर कोरियाच्या वादात चीन आमच्यासोबत- डोनाल्ड ट्रम्प
By admin | Published: April 30, 2017 08:37 AM2017-04-30T08:37:49+5:302017-04-30T08:37:49+5:30
उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर चीन आमच्यासोबत असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 30 - उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर चीन आमच्यासोबत असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळल्यास 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेतील मीडियावरही निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी चीनबाबत नरमाईची भूमिका घेत उत्तर कोरियाच्या प्रश्नावर चीन सहकार्य करत असल्याचंही सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील मीडियाच्या मेजवानीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. 1981नंतर ट्रम्प हे असे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी मीडिया मेजवानी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. पेन्सिलवेनियातील एका रॅलीमध्ये ट्रम्प यांनी 100 दिवसांच्या कार्यकाळातील कामकाजाची जनतेला माहिती दिली. मात्र या भाषणात ट्रम्प यांनी जास्त करून अमेरिकी मीडियावरच टीका केली आहे. यावेळी काही जणांनी ट्रम्प यांचं पत्रकारांवर टीका करण्याच्या भूमिकेचं समर्थनही केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील करात मोठी कपात केली आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच अमेरिकेतून इतर देशांत गेलेल्या कंपन्या अमेरिकेत पुन्हा येऊन अमेरिकेच्या रोजगारात भर पडणार आहे. ट्रम्प म्हणाले, सर्वांनी आता घरी जाऊन निवांत झोपा. आम्ही कोणत्याही परिस्थिती मॅक्सिकोची भिंत बनवणार आहोत. ट्रम्प यांना मॅक्सिकोमध्ये भिंत उभारण्यासाठी कोणाकडूनही मदत मिळत नाही आहे. त्यामुळे ते 62 मैलांची लांब भिंत बांधण्यासाठी काँग्रेसच्या निधीचा उपयोग करण्याच्या विचारात आहेत.