कमला हॅरिस यांच्या दौऱ्यापूर्वी उत्तर कोरियाची धमकी, जपानच्या समुद्रात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:32 PM2022-09-28T17:32:21+5:302022-09-28T17:33:27+5:30
north korea : जी क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ती कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे होती, जी राजधानी प्योंगयांगमधून पूर्व किनाऱ्याच्या दिशेने डागण्यात आली होती.
जपान समुद्राच्या दिशेने उत्तर कोरियाने दोन 'संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे' डागली आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यापूर्वी उत्तर कोरियाच्या लष्कराने ही धोकादायक क्षेपणास्त्रे सोडली आहेत. जपानचे पंतप्रधान कार्यालय, जपानी तटरक्षक दल आणि दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी क्षेपणास्त्र चाचणीची पुष्टी केली आहे. जी क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ती कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे होती, जी राजधानी प्योंगयांगमधून पूर्व किनाऱ्याच्या दिशेने डागण्यात आली होती.
उत्तर कोरियाने यावर्षी विक्रमी धोकादायक शस्त्रास्त्रांची चाचणी केली आहे. उत्तर कोरियाने या वर्षी 32 वेळा अशा धोकादायक शस्त्रास्त्रांची यशस्वी चाचणी केल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांनी क्षेपणास्त्र चाचणीची शक्यता व्यक्त केली होती. दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर संस्थांचा दावा आहे की, याद्वारे उत्तर कोरिया अण्वस्त्रांच्या बाबतीत स्वत:ला मजबूत करत आहे आणि या संदर्भात उत्तर कोरियाच्या सैन्याने आपल्या अण्वस्त्र साइटवर आणखी एक बोगदा तयार केला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस गुरुवारी दक्षिण कोरियाला पोहोचणार आहेत. याठिकाणी त्या उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. आपल्या दौऱ्यात हॅरिस उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमधील तटबंदीसारखी परिस्थिती असलेल्या भागांनाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेली यूएसएस रोनाल्ड रेगन ही अमेरिकी विमानवाहू युद्धनौकाही दक्षिण कोरियाच्या बंदरात पोहोचली आहे, जिथे अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे नौदल एकत्रितपणे युद्धाभ्यास करतील. अमेरिका हा दक्षिण कोरियाचा प्रमुख सुरक्षा सहयोगी आहे आणि येथे हजारो अमेरिकन सैनिक तैनात आहेत.
उत्तर कोरियाकडून सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता अमेरिकेने दक्षिण कोरियात 28,500 उच्च कुशल सैनिक तैनात केले आहेत, असे म्हटले जात आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्याने यापूर्वी अनेक लष्करी सराव केले आहेत. मात्र, उत्तर कोरियाने या सरावांवर नेहमीच टीका केली आहे आणि आरोप करत आहे की, दक्षिण कोरिया असे सराव करून उत्तर कोरियाला हल्ल्याचा इशारा देत आहे.