...तर उत्तर कोरियाचा बंदोबस्त करणार !
By admin | Published: April 4, 2017 05:15 AM2017-04-04T05:15:15+5:302017-04-04T05:15:15+5:30
चीनने उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाला लगाम न घातल्यास अमेरिका एकटाच त्याचा बंदोबस्त करण्यास तयार आहे
पोटोमॅक फॉल्स (अमेरिका) : चीनने उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाला लगाम न घातल्यास अमेरिका एकटाच त्याचा बंदोबस्त करण्यास तयार आहे, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यात आपण हा मुद्दा उपस्थित करू, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘होय, आम्ही उत्तर कोरियाबाबत बोलणार आहोत. उत्तर कोरियावर चीनचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या मुद्यावर चीन आमची किती मदत करतो हे पाहावे लागेल. त्याने जर मदत केली नाही, तर अमेरिका स्वत:च हा मुद्दा सोडवेल, असे ट्रम्प म्हणाले. साऊथ फ्लोरिडा येथील मार- ए- लेगो इस्टेटमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीच्या काही दिवस आधी ट्रम्प यांनी वरील टिपणी केली. या बैठकीत उभय नेत्यांत उत्तर कोरियाशिवाय व्यापार आणि दक्षिण चीन सागराबाबतच्या प्रादेशिक वादावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिका चीनच्या मदतीशिवाय उत्तर कोरियातील परिस्थिती हाताळू शकतो, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही उत्तर कोरियात परिस्थिती कशी हाताळाल, असा प्रश्न विचारला असता ते मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला हे ठाऊक आहे मी गतकाळातील अमेरिका नाही. यापूर्वी आम्ही पश्चिम आशियात काय करणार हे सांगितले जात असे; पण आता तसे होणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. (वृत्तसंस्था)
>अनेकदा तक्रार... पण फरक नाही
दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानसारख्या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे याची अनेकदा तक्रार केली आहे. यावर्षी उत्तर कोरियाने पाच अण्वस्त्र आणि एका क्षेपणास्त्र मालिकेची चाचणी सुरू केली.ओबामा यांच्यानंतर ट्रम्प प्रशासनातही उत्तर कोरियाने शस्त्र विस्तार कार्यक्रम बंद केला नाही. गेल्यावर्षी जानेवारीत त्याने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. ट्रम्प यांनी इशारा दिल्यानंतरही उत्तर कोरिया शस्त्र विस्तार कार्यक्रम सोडण्यास तयार नाही.