ऐतिहासिक भेट! बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 07:27 AM2018-04-27T07:27:19+5:302018-04-27T07:27:19+5:30
दक्षिण कोरिया व उत्तर कोरियात आज ऐतिहासिक चर्चा होणार आहे.
पन्मुंजोम- दक्षिण कोरिया व उत्तर कोरियात आज ऐतिहासिक चर्चा होणार आहे. आंतर-कोरियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल झाले आहेत. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते ठरले आहेत.
WATCH: North Korean leader Kim Jong Un, crosses the southern border to meet rival Moon Jae-in for the summit on nuke crisis in Panmunjom. #SouthKoreapic.twitter.com/hq58iYQcUz
— ANI (@ANI) April 27, 2018
Panmunjom: Inside visuals of the meeting between North & South Korean leaders for summit talks on the North's nuclear weapons. #SouthKoreapic.twitter.com/cz9r1t7Oyt
— ANI (@ANI) April 27, 2018
उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांचा भविष्यात त्याग करू शकेल का या संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या विषयावर यामध्ये चर्चा होऊ शकते. तसेच या दोन्ही शेजारी देशांमधील तणाव निवळण्यासाठीही या परिषदेचा उपयोग होऊ शकतो. यापूर्वी 2000 आणि 2007 साली अशाच प्रकारची परिषद झाली होती. या बैठकीमुळे किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या चर्चेसाठीही आशादायक प्रगती होणार आहे.
किम आणि त्यांच्या नऊ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दोन्ही देशांच्या सीमेजवळ मून जाए-इन भेट घेतील. त्यानंतर साऊथ कोरियन रक्षकदल दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या लष्करमुक्त प्रदेशामध्ये असणाऱ्या पॅन्मुन्जोम येथे दोन्ही नेत्यांना घेऊन जाईल. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता चर्चेला सुरुवात होईल. ही चर्चा पॅन्मुन्जोम येथे पीस हाऊस या इमारतीत होणार आहे. पहिल्या सत्रानंतर भोजनासाठी उत्तर कोरियन शिष्टमंडळ व किम पुन्हा आपल्या देशात जातील. जेवणानंतर ते पुन्हा चर्चेसाठी सीमा ओलांडून द. कोरियात येतील. दुपारच्या सत्रात दोन्ही देशांची माती आणि पाणी वापरुन एका पाईनच्या रोपाचे रोपण दोन्ही नेते करतील. शांतता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून या दोन्ही देशांमधील माती व पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेसाठी किम जोंग उन यांच्या शिष्टमंडळात त्यांची बहिण किम यो-जोंगचाही समावेश आहे. किम योंग-नाम हे उत्तर कोरियाचे नामधारी प्रमुख आहेत तेसुद्धा या चर्चेत सहभागी होतील.