....आदेश मिळाल्यास अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 01:25 PM2017-08-10T13:25:12+5:302017-08-10T13:25:30+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीनंतर जनतेनं हे विरोध प्रदर्शन केलं आहे.
प्योंगयांग, दि. 10 - अमेरिका आणि उत्तर कोरियामधील वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला उद्ध्वस्त करण्याच्या दिलेल्या धमकीनंतर तिथल्या लोकांनी अमेरिकेविरोधात विरोध प्रदर्शन केलं आहे. तसेच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांना जाहीर समर्थन दिलं आहे. जर आमच्या हुकूमशाहानं आदेश दिला, तर अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकू, असं उत्तर कोरियाच्या जनतेनं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीनंतर जनतेनं हे विरोध प्रदर्शन केलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प पहिल्यापासूनच उत्तर कोरियाला धमकी देत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी दिलेली ही शेवटची धमकी समजली जातेय. ट्रम्प म्हणाले होते, उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं, तर जगात कुठल्याही देशाचा झाला नाही, उत्तर कोरियाचा असा विध्वंस करू. ट्रम्प यांच्या या विधानानंतर उत्तर कोरियाच्या जनतेनं अमेरिकेच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे. अमेरिका प्रशांत महासागरातील गुआमवर मिसाइल हल्ला करण्याच्या विचारात आहे. त्यालाही उत्तर कोरियाच्या जनतेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तर कोरियाच्या सरकारनंच या रॅलीचं आयोजन केलं आहे. रॅलीमध्ये उत्तर कोरियाच्या जनतेनं अमेरिकेच्या विरोधात स्लोगन आणि बॅनर, पोस्टर्स लावून विरोध प्रदर्शन केलं आहे. रॅलीमधील एका विद्यार्थ्यांनी अमेरिकेलाच धमकी दिली आहे. उत्तर कोरियाची स्वातंत्र्यता आणि विकासाच्या अधिकाराला काढून घेणा-या अमेरिकेला कधीही सहन करणार नाही. आमचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी आदेश दिल्यास अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून त्याला उद्ध्वस्त करू. तो विद्यार्थी म्हणाला, गुआनमधील अमेरिकेच्या लष्करावल मिसाइल टाकण्याच्या आम्ही विचारात आहोत.
अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अण्वस्त्र चाचणी करणा-या उत्तर कोरिया या देशावर गेल्या काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रानं कडक निर्बंध लादले होते. उत्तर कोरियावर कडक प्रतिबंध लादण्यासाठी अमेरिकेनं एक प्रस्ताव तयार करून संयुक्त राष्ट्रात ठेवला होता. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रानं सर्व देशांच्या संमतीनं मंजुरी दिली होती. उत्तर कोरियानं लागोपाठ घेतलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियावर कडक निर्बंध घातले आहेत. तसेच उत्तर कोरियातून होणा-या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियाच्या निर्यातीवर प्रतिबंध घातल्यामुळे प्योंगयांगला वर्षाकाठी जवळपास 1 अब्ज डॉलरला मुकावं लागणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाविरोधात एवढं कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रस्तावानुसार मासे व समुद्री खाद्यपदार्थ, कोळसा, लोह इत्यादींच्या निर्यातीवर निर्भर असलेल्या उत्तर कोरियाला आता निर्यात करता येणार नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. जर सर्व देशांनी हे प्रतिबंध पाळल्यास उत्तर कोरियाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. चीनसोबत जवळपास एका महिन्याच्या चर्चेनंतर अमेरिकेनं या प्रस्तावाचा मसुदा तयार केला आहे. चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यापारी सहयोगी आहे. 4 जुलै रोजी उत्तर कोरियानं केलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण घेतल्यानंतर हा प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी 28 जुलै रोजी उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्रानं 2006 पासून आतापर्यंत उत्तर कोरियावर जवळपास सात वेळा निर्बंध लादले आहेत. मात्र या प्रस्तावानंतर उत्तर कोरियाच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला दिसला नाही.