डोनाल्ड ट्रम्प आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर, अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांनंतर उत्तर कोरियाची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 08:12 AM2017-09-24T08:12:18+5:302017-09-24T08:14:59+5:30
हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूयॉर्क, दि. 24 - हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल."
शनिवारी अमेरिकी वायूसेनेची बी-1बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून घिरट्या घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी गुरुवारी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली.
‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’
यानंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रंप यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली. ट्रंप यांनी दिलेल्या धमकीबाबत पत्रकारांनी विचारले असता, कुत्रे भुंकत असतात पण हत्ती चालत असतो या म्हणीचा त्यांनी वापर केला. कुत्र्यासारखं भुंकण्याने जर आम्ही घाबरू असं त्यांना वाटत असेल तर ते स्वप्न पाहात आहेत असं यांग हो म्हणाले.
या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. यामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.