उत्तर कोरियाच्या अणू केंद्राचा ‘मृत्यू’ पाहणार विदेशी पत्रकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:07 AM2018-05-23T00:07:47+5:302018-05-23T00:07:47+5:30
ब्रिटन, रशिया, चीन आणि अमेरिकेतील प्रतिनिधींची तुकडी दाखल
वोन्सान (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाने आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांचे प्युंगे-रीतील भूमीगत अणुचाचणी केंद्र नष्ट करण्याचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठी ब्रिटन, रशिया, चीन व अमेरिकेतील माध्यम प्रतिनिधींची एक तुकडी मंगळवारी येथे दाखल झाली. मात्र दक्षिण कोरियाच्या सात जणांना ऐनवेळी व्हिसा नाकारल्याने ते आले नाहीत.
विदेशी पत्रकार विमानाने चीनहून येथे आले. नंतर त्यांना रेल्वेने प्युंगे-री येथे नेण्यात येईल. मात्र उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय अणुतज्ज्ञांना निमंत्रण दिलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे नेते किम ज्याँग ऊन यांच्या पुढील महिन्यातील नियोजित शिखर बैठकीसाठी अनुकूल पृष्ठभूमी तयार करण्यासाठी उत्तर कोरियाने हे अणूचाचणी केंद्र कायमचे बंद करण्याचे जाहीर केले.
तरीही अण्वस्त्रमुक्त होण्याची खात्री नाहीच!
यामुळे कोरियन उपखंड पूर्णपणे अण्वस्त्रमुक्त होण्याची खात्री नाही. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये शक्तिशाली अणुचाचणी केली तेव्हा आमचे इप्सित साध्य झाल्याचे किम यांनी जाहीर केले होते. शिवाय भविष़्यात गरज वाटेल तेव्हा उत्तर कोरिया नवे केंद्र उभारू शकते. यापूर्वी त्यांनी तसे केलेले आहे.