उत्तर कोरियाचा जगभर ‘अणु’कंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 06:00 AM2016-09-10T06:00:36+5:302016-09-10T06:00:36+5:30
उत्तर कोरियाने शुक्रवारी सकाळी अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केल्यामुळे जगभरातील सर्व देशांमध्ये प्रचंड खळबळ माजली
सोल : उत्तर कोरियाने शुक्रवारी सकाळी अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केल्यामुळे जगभरातील सर्व देशांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, जागतिक शेअर बाजारांवरही त्याचा परिणाम झाला; आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव खाली आले. भारतात सेन्सेक्स, निफ्टी, सोने, चांदी, रुपये हे सारे घसरल्यामुळे बाजारपेठेत अस्वस्थता होती. आमच्या अणुशास्त्रज्ञांनी नव्याने विकसित केलेल्या शस्त्राचा देशाच्या उत्तरेकडील अणुचाचणी ठिकाणी स्फोट घडविला, अशी घोषणा उत्तर कोरियाच्या दूरचित्रवाणीवरून करण्यात आली. ही चाचणी उत्तर कोरियाची सर्वांत मोठी म्हणजे १० किलो टन एवढी आहे.
उत्तर कोरियाने केलेल्या या अणुचाचणीची क्षमता ५.३ तीव्रतेच्या भूकंपाएवढी होती. हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या १५ किलो टन अणुबॉम्बपेक्षा किंचित कमी ही चाचणी होती, असे साऊथ मेटेओरोलॉजिकलचे किम नाम-वूक यांनी म्हटले. या चाचणीमुळे जगाच्या अनेक भागांत भूकंपाप्रमाणे लहान-मोठे धक्के जाणवले. चीनसह जगातील जवळपास सर्व राष्ट्रांनी उत्तर कोरियाच्या या अणुचाचणीचा कडक शब्दांत निषेध केला असून, यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा चीनने दिला आहे. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र आहे.
अमेरिकेने या चाचणीनंतर उत्तर कोरियाला गंभीर परिणामाचा इशारा दिला आहे. (वृत्तसंस्था)
>दक्षिण कोरियाने केला निषेध
दक्षिण कोरियाने याचा निषेध करून उत्तर कोरियाचा तरुण सत्ताधारी किम जोंग-ऊन याचा हा ‘वेडपट अविचारीपणा’ स्वत:च्याच नाशाकडे घेऊन जाईल, असे म्हटले आहे. ही चाचणी घेण्याच्या आधी उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांचीही चाचणी केली होती व तिचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र निषेधही झाला होता. संयुक्त राष्ट्रांनी त्या देशावर निर्बंधही लादले आहेत.
उत्तर कोरियाचा किम जोंग ऊन विक्षिप्त स्वभावाबद्दल आणि हुकूमशाही वागणुकीबद्दल ओळखला जातो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत डुलकी लागली, असा आरोप ठेवून त्याने उपपंतप्रधानांना अलीकडेच फाशीची शिक्षा दिली होती.
>चाचणी खेदजनक
व्हिएन्ना : ही आणि आतापर्यंतची पाचवी अणुचाचणी खूपच ‘त्रासदायक आणि खेदजनक’ असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या अॅटॉमिक वॉचडॉगने व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आतापर्यंत केलेल्या अनेक ठरावांचे या चाचणीने उल्लंघन केले आहे व आंतरराष्ट्रीय समुदायाने वारंवार केलेल्या आवाहनांचा ही चाचणी अवमान असल्याचे इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीचे प्रमुख युकिया अमॅनो यांनी म्हटले.
>व्हिएतनाममध्ये एसिआन परिषद संपत असतानाच अण्वस्त्रबंदीची भाषा केली. त्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने अण्वस्त्राची चाचणी केल्यामुळे या परिषदेतील देशांनाही धक्का बसला आहे.