अमेरिकेचा दबाव झुगारून उत्तर कोरियाची पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी
By admin | Published: May 14, 2017 04:24 PM2017-05-14T16:24:13+5:302017-05-14T16:24:13+5:30
उत्तर कोरियावर क्षेपणास्त्र चाचणी न घेण्याचा दबाव वाढत असतानाच उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली
ऑनलाइन लोकमत
सेऊल, दि. 14 - गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियावर क्षेपणास्त्र चाचणी न घेण्याचा दबाव वाढत असतानाच उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी घेऊन अमेरिकेला एक प्रकारे धक्का दिला आहे. आठवड्याभरापूर्वीच दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या मून जे इन यांनी उत्तर कोरियाशी चर्चा करून हा मुद्दा निकाली काढण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावर कढी करत उत्तर कोरियानं स्वतःचा आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. उत्तर कोरियानं एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
बीबीसीच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने कुसोंग शहरानजीकच्या समुद्रात स्थानिक वेळेनुसार 2,000 किलोमीटरच्या उंचीवरून मारा करणा-या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, पहाटे साडेपाच वाजण्याच्यादरम्यान हे क्षेपणास्त्र समुद्रात जवळपास सातशे किमी दूरपर्यंतच्या अंतरावर जाऊन पडले आहे. संयुक्त राष्ट्रानं बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या परीक्षणावर प्रतिबंध घातले आहेत. तत्पूर्वी उत्तर कोरियानं संयुक्त राष्ट्रांचे नियम पायदळी तुडवून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. मात्र, ही चाचणी अयशस्वी ठरली होती.
दरम्यान, दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मून जे इन यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या चाचणीवर टीकाही केली होती. त्यांनी या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा परिषदेची आपात्कालीन बैठक बोलावली आहे. या प्रकरणावर चीननंही सावध भूमिका घेतली असून, आता अमेरिकेच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.