उत्तर कोरियाची मोठी घोडचूक, स्वतःच्याच शहरावर कोसळलं मिसाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 05:48 PM2018-01-05T17:48:32+5:302018-01-05T18:59:21+5:30
उत्तर कोरियानं दुस-या कोणत्याही नव्हे, तर स्वतःच्याच देशावर मिसाइल टाकली आहे. अमेरिकेच्या अधिका-यांच्या मते, उत्तर कोरियानं गेल्या वर्षी 28 एप्रिलला सोंग-12 नावाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी घेतली.
लंडन- उत्तर कोरिया हा देश अण्वस्त्र चाचण्यांमुळे कायम चर्चेत असतो. अमेरिकेच्या वारंवार इशा-यानंतर उत्तर कोरियानं अण्वस्त्र चाचणी घेण्याचा कार्यक्रम काही थांबवलेला नाही. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचं दुस-या कोणत्याही नव्हे, तर स्वतःच्याच देशावर मिसाइल कोसळलं आहे. अमेरिकेच्या अधिका-यांच्या मते, उत्तर कोरियानं गेल्या वर्षी 28 एप्रिलला सोंग-12 नावाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान मिसाइलमध्ये स्फोट होऊन ती त्यांच्याच देशातील एका शहरावर कोसळली. उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयोंगहून जवळपास 90 मैल दूरवरच्या टोकचोन शहरावर जाऊन ते मिसाइल पडलं.
टोकचोन शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाखांहून अधिक आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांवरून याचा खुलासा केला आहे. टोकचोन या शहरावर मिसाइल कोसळल्यानंतर इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल इमारतीचं मोठं नुकसान झालं होतं. रिपोर्टनुसार, मिसाइलचं प्रक्षेपण केल्यानंतर ही मिसाइल उत्तर-पूर्व दिशेनं 24 मैलांपर्यंत गेली होती. त्यानंतर ही मिसाइल 43 मैलांवरून अधिक जाऊ शकली नाही.
या मिसाइलचं प्रक्षेपण केल्यानंतर त्याचं इंजिन निकामी झालं. मिसाइलचं इंजिन निकामी झाल्यानंतर त्यातून निघालेल्या लिक्विडमुळे मोठ्या प्रमाणात स्फोट झाला. मिसाइल चाचणीनंतर गुगलनं घेतलेल्या फोटोंवरून हे सिद्ध झालं आहे. मिसाइल पडलेल्या ठिकाणी सध्या काहीही दिसत नाही. त्यापूर्वी तिथे एक इमारत होती. परंतु उत्तर कोरियानं अमेरिकेच्या या वृत्ताचं खंडन केलं आहे. अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचं उत्तर कोरियानं स्पष्ट केलं आहे.
कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण
उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्योंगयोंगवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने युद्धसरावास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज या कवायतींमध्ये अमेरिकेची लढाऊ बी-1बी विमाने सहभागी झाली होती. दरम्यान अमेरिकेने उचललेल्या या पावलानंतर उत्तर कोरिया बिथरला असून, याचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
उत्तर कोरियाने या युद्धसरावाविरोधाक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा युद्धसराव कोरियव द्विपकल्पाला युद्धाच्या दिशेने घेऊन जाईल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. अमेरिकेच्या विमानांनी गुआम येईल हवाईहद्दीतून उड्डाण केले होते. या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेची एफ-२२ आणि एफ-३५ स्टील्थ फायटर विमाने सहभागी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा युद्धसराव करण्यात येत आहे.
उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर हल्ला करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा दावाही केला होता. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्रात हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते.