Coronavirus: कोविड १९ च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नॉर्वे पंतप्रधानांना पोलिसांनी ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 10:07 AM2021-04-10T10:07:11+5:302021-04-10T10:07:35+5:30
कोरोनाच्या अशाच एका नियमाचे उल्लंघन नॉर्वेच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे पोलिसांनी थेट पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड आकारला.
आज जगातील सर्व देशात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे. प्रत्येक देश कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनसारखी पाऊलं उचलली जात आहेत. कोरोनामुळे तयार करण्यात आलेले निर्बंध आणि नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या अशाच एका नियमाचे उल्लंघन नॉर्वेच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे पोलिसांनी थेट पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड आकारला.
नॉर्वेच्या पोलिसांनी ९ एप्रिलला सांगितलं की, पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीताल सदस्यांना एकत्रित केले होते. याठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाली त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड ठोठावला. पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकरणात दंड आकारला जात नाही. परंतु पंतप्रधान निर्बंध लागू करणाऱ्या सरकारचं प्रतिनिधित्व करतात त्यासाठी आम्हाला त्यांना दंड आकारावा लागला.
कायदा सर्वांसाठी एकसमान असतो, पण सर्वजण कायद्याच्या नजरेत एकसारखे नसतात. पंतप्रधानांच्या पतीनेही कायदा तोडला पण त्यांच्यावर दंड आकारला नाही. ज्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी झाली. त्यांनीही नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावरही दंड आकारला नाही. परंतु पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड आकारण्यात आला.
पंतप्रधानांनी मागितली माफी
रॉयटर्सच्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने आतापर्यंत या प्रकरणावर कोणतंही भाष्य केले नाही. परंतु ६० व्या जन्मदिनी पार्टी केल्याबद्दल पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी माफी मागितली आहे. या कार्यक्रमात कुटुंबातील १३ सदस्य सहभागी झाले होते. सरकारने देशात १० पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी केली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नॉर्वे सरकारकडून हे नियम लागू करण्यात आले आहेत.