ही मुस्लिमांवरील बंदी नाही - ट्रम्प यांचा खुलासा
By admin | Published: January 30, 2017 05:33 AM2017-01-30T05:33:20+5:302017-01-30T05:33:20+5:30
सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत नागरीक निदर्शने करत आहेत
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 30 - सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत नागरीक निदर्शने करत आहेत. सर्वच स्तारातून त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. सर्वच त्यांच्यावर टीका होत असली तरी हा निर्णय योग्य असून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले. तसेच ही सरसकट सर्व मुस्लिमांवरील बंदी नसून त्यातून कट्टरतावादी मुस्लीम व दहशतवाद्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याशिवाय लॉबिंग बंदी, इस्लामिक स्टेटचा पराभव करण्याची योजना तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला बलशाली करण्याची योजना यांच्यावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.
इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या मुस्लीम देशातील व्यक्तींना ९० दिवस प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला आहे.
देशातील विमानतळ आणि अन्य ठिकाणी निरीक्षण केल्यास दिसून येईल की, या आदेशाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. त्यातून जी परिस्थिती निर्माण होईल ती हाताळण्यास आम्ही तयार आहोत, असेही ट्रम्प म्हणाले.
या व्यूहरचनेमुळे अमेरिका इसिसविरोधात निर्णायक पाऊल उचलू शकेल. अमेरिका तोंड देत आहे तो मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद एवढाच इसिसचा धोका नाही तर ती खूपच विषारी आणि आक्रमक संघटना आहे. ती स्वत:चे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संघटनेत चर्चेला, वाटाघाटींना जागा नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.