येशू ख्रिस्त नव्हे शी जिनपिंगच तुम्हाला वाचवतील! येशूचे फोटो काढून त्याजागी लावा चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 01:21 PM2017-11-15T13:21:37+5:302017-11-15T13:29:34+5:30
येशू तुमची गरीबी किंवा आजारपण दूर करु शकत नाही पण कम्युनिस्ट पार्टी तुम्हाला दु:खातून मुक्ती देऊ शकते.
बिजींग - येशू ख्रिस्त नव्हे शी जिनपिंगच तुमची गरीबी दूर करु शकतात. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्ताचा फोटो काढा व तिथे जिनपिंग यांचा चांगला फोटो लावा असा प्रचार चीनमध्ये सुरु आहे. चीनच्या शासकीय यंत्रणेतील अधिकारीच तसा प्रचार करत आहेत. चीनच्या दक्षिण पूर्व युगान प्रांतात राहणा-या ख्रिश्चन नागरिकांना भिंतीवरुन येशू ख्रिस्ताचा फोटो काढून तिथे जिनपिंग यांचा फोटो लावण्यास सांगण्यात आले आहे.
येशू तुमची गरीबी किंवा आजारपण दूर करु शकत नाही पण कम्युनिस्ट पार्टी तुम्हाला दु:खातून मुक्ती देऊ शकते असे हे अधिकारी सांगत आहेत. जियांक्षी प्रांत गरीबी आणि तिथे मोठया प्रमाणावर राहणा-या ख्रिश्चन समुदायासाठी ओळखला जातो. या प्रांतातील दहा लाख नागरिकांपैकी 11 टक्क्यांपेक्षा जास्त लोक दारिद्रय रेषेखाली राहतात.
वॉशिंग्टन पोस्टने युगान प्रांतातील सोशल मीडिया अकाऊंटच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी स्वेच्छेने ख्रिश्चन धर्माशी संबंधित 624 पोस्टर्स हटवले असून, त्याजागी 453 ठिकाणी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे फोटो लावले आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने गरीबी निर्मूलनाची मोहिम हाती घेतली आहे.
पक्षाचे सदस्य गावोगावचा दौरा करुन पक्ष कशा प्रकारे शेतक-यांच्या पाठिशी आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. 2020 पर्यंत गरीबी हटवण्याला चीनने आपले पहिले प्राधान्य दिले आहे. फक्त राजकीय दृष्टीकोनातून नव्हे तर समाजातील तळगाळापर्यंत नियंत्रण मिळवणे हा सुद्धा या मोहिमेमागे उद्देश आहे.
युद्धासाठी सज्ज रहा - शी जिनपिंग यांचे चिनी लष्कराला आदेश
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नव्या नेतृत्वाबरोबर पहिली बैठक झाली. चिनी लष्कराला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हटले जाते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने 19 व्या काँग्रेस परिषदेत केंद्रीय लष्करी आयोगावर नव्या सदस्यांची निवड केली आहे. या सदस्यांबरोबर शी जिनपिंग यांनी चर्चा केली. यावेळी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला युद्ध जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला तसेच युद्धासाठी सज्ज राहण्यासही सांगितले.
युद्ध कसे जिंकता येईल त्यावर लक्ष द्या तसेच लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर (मॉर्डनायझेशन) भर देण्यास सांगितले. 2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या बैठकीच्यावेळी शी जिनपिंग लष्करी गणवेशात होते. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना पक्षासोबत पूर्णपणे एकनिष्ठ रहाण्याचा आदेश दिला. 2035 पर्यंत चिनी लष्कराची मॉर्डनायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.