मुलींना शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे जगाचे 15 ते 30 ट्रिलियन डॉलरचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:20 PM2018-07-12T18:20:57+5:302018-07-12T18:23:05+5:30
संयुक्त राष्ट्र मुलींच्या शिक्षणासाठी मलाला दिन साजरा करतो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला जागतिक बँकेने मिस्ड अपॉर्च्युनिटिज- द हाय कॉस्ट ऑफ नॉट एज्युकेटिंग गर्ल्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
न्यू यॉर्क- मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे 15 ते ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे नुकसान होत आहे असे मत जागतिक बँकेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमधील दोन तृतियांशापेक्षा कमी मुली प्राथमिक शिक्षण घेतात त्याचप्रमाणे प्रत्येक तीन मुलींपैकी फक्त एका मुलीस निम्न माध्यमिक वर्गापर्यंत शिक्षण घेता येते.
संयुक्त राष्ट्र मुलींच्या शिक्षणासाठी मलाला दिन साजरा करतो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला जागतिक बँकेने मिस्ड अपॉर्च्युनिटिज- द हाय कॉस्ट ऑफ नॉट एज्युकेटिंग गर्ल्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरात महिलांना शिक्षण न दिल्यामुळे 15 ते 30 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे असे त्या अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण मिळालेल्या महिलांचा काम करणाऱ्या लोकांमध्ये समावेश असतो. अशिक्षित महिलांपेक्षा ते दुपटीने कमवू शकतात. जेव्हा 130 दशलक्ष मुली शिक्षणापासून वंचित राहातात, त्या इंजिनियर, पत्रकार किंवा सीइओ होण्यापासून रोखल्या जातात तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते आणि सार्वजनिक आरोग्य, स्थैर्य यांची हानी होते.असे मलाला निधीची सहसंस्थापिका मलाला युसुफजाईने म्हटले होते. 12 जुलै 2013 रोजी मलाला युसुफजाईने तिच्या 16 व्या वाढदिवशी संयुक्त राष्ट्रात भाषण केले होते. हा दिवस आता मलाला दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार 6 ते 17 वयातील 132 दशलक्ष मुली शाळेत जात नाहीत. जागतिक प्रगतीच्या मार्गात अशा प्रकारची असामनता ठेवणे योग्य नाही असे जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तलिना जिओर्जिएवा यांनी सांगितले.