जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:06 PM2024-07-03T22:06:48+5:302024-07-03T22:07:24+5:30
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यावरुन डेमोक्रॅट पक्षात दोन गट पडले आहेत.
American Elections : अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत डेमोक्रॅट पक्षात (Democratic Party) दोन गट पडले आहे. बायडेन यांच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना विश्वास आहे की, पक्ष पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देईल. पण, याबाबत पक्षातील सर्वोच्च नेतृत्व आणि समर्थकांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत.
विशेष म्हणजे, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील (Barack Obama) जो बायडेन यांच्या उमेदवारीला विरोध करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, एका सर्वेक्षणात बायडेन यांच्याऐवजी बराक ओबामा यांची पत्नी मिशेल (Michelle Obama) यांचे नाव पुढे आले आहे. मिशेल ओबामा यांना लॉन्च करण्यासाठी पडद्यामागे मोठी खेळी सुरू असल्याचे मानले जात आहे.
रॉयटर्स न्यूज एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मिशेल ओबामा या प्रमुख दावेदार असू शकतात. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करण्यासाठी मिशेल ओबामा योग्य उमेदवार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणात 1070 लोकांनी सहभाग घेतला, त्यापैकी 892 नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये 348 डेमोक्रॅट, 322 रिपब्लिकन आणि 303 अपक्ष मतदार सहभागी झाले होते.
मिशेलच्या बाजूने 50 टक्के मते
सर्वेक्षण केलेल्यांपैकी 50 टक्के लोकांनी मिशेल ओबामा यांच्या बाजूने मत दिले, तर 39 टक्के लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने मतदान केले. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह डेमोक्रॅटिक पक्षाचे इतर संभाव्य उमेदवार खूप मागे आहेत.