भारताचे NSG सदस्यत्व कार्यक्रमपत्रिकेवरही नाही - चीन
By admin | Published: June 20, 2016 03:20 PM2016-06-20T15:20:09+5:302016-06-20T15:23:13+5:30
एनएसजी गटात नव्या देशांच्या समावेशावरुन सदस्य देशांमध्ये मतभेद कायम असून, सेऊलमध्ये होणा-या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा विषय कार्यक्रमपत्रिकेवरही नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. २० - एनएसजी गटात नव्या देशांच्या समावेशावरुन सदस्य देशांमध्ये मतभेद कायम असून, सेऊलमध्ये होणा-या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा विषय कार्यक्रमपत्रिकेवरही नाही असे चीनने सोमवारी सांगितले. त्यामुळे एनएसजीमध्ये भारताच्या समावेशाला चीनचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीन विरोध करणार नाही असे म्हटले होते. स्वराज यांच्या विधानानंतर काही तासातच चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्रसचिव एस.जयशंकर यांनीही चीनचे मन वळवण्यासाठी १६-१७ जूनला चीनचा दौरा केला होता.
अणवस्त्रप्रसारबंदीवर स्वाक्षरी न केलेल्या देशांना समावेश देण्यावरुन एनएसजीमध्ये मतभेद आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. २४ जूनला एनएसजी देशांची दक्षिण कोरिया येथे बैठक होणार आहे.
या संघटनेत एकूण ४८ देश आहेत. इथे मतदान घेऊन बहुमताने निर्णय होत नाही. सर्व सदस्य देशांचे एकमत असेल तरच, नव्या सदस्याला प्रवेश दिला जातो. अणवस्त्रप्रसार बंदी या संघटनेचा मूळ हेतू आहे. भारताने या करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. भारत आणि पाकिस्तान दोघांनीही सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. अमेरिकेचा भारताला तर, चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे.