घोटाळ्यांचा नव्हे, तर कौशल्याधिष्ठित देश करणार
By admin | Published: April 16, 2015 11:58 PM2015-04-16T23:58:32+5:302015-04-16T23:58:32+5:30
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने करून ठेवलेला गोंधळ दूर करून भारताची प्रतिमा घोटाळ्यांचा देश अशी पुसून कौशल्य असलेला अशी करण्याची प्रतिज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केली.
टोरोंटो : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने करून ठेवलेला गोंधळ दूर करून भारताची प्रतिमा घोटाळ्यांचा देश अशी पुसून कौशल्य असलेला अशी करण्याची प्रतिज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केली. अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर येथे ज्या पद्धतीने मोदींनी भारतीय समुदायासमोर भाषण केले होते त्याच पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर हे सपत्नीक उपस्थित होते. मोदी यांच्या अंगात पिवळा कुर्ता आणि खांद्यावर उपरणे होते.
मोदी यांनी गुजराती भाषेत ‘केम छो’ (कसे आहात) असे विचारून आपल्या भाषणाला प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या भारतीयांसमोर सुरुवात केली. भारतापुढे अनेक आव्हाने उभी असून त्याला एकच औषध आहे, असे मोदी यांनी म्हणताच उपस्थितांतून ‘मोदी मोदी’ असा प्रतिसाद आला. यावर मोदी यांनी ‘मी’ नव्हे तर विकास हा सगळ्या आव्हानांवर उत्तर आहे. केवळ विकासच देशाला पुढे नेऊ शकतो, असे सांगितले.
संपुआ सरकारचा प्रत्यक्ष उल्लेख न करता जोरदार हल्ला करताना मोदी म्हणाले,‘‘ज्यांना घाण करून ठेवायची होती ते ती करून निघून गेले. परंतु आम्ही ती स्वच्छ करू.’’ देश खूप प्रचंड आहे. तेथे खूप गोंधळही आहे व तो खूप दिवसांपासूनचा आहे. तो दूर करायला वेळ लागेल; परंतु लोकांची मानसिकता आता बदलल्यामुळे तो दूर केला जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. भारताची प्रतिमा घोटाळ्यांचा देश अशी होती. आम्हाला ती कौशल्ये असलेला अशी करायची आहे.
कौशल्ये विकासावर माझ्या सरकारचा भर आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, ‘‘२०३० मध्ये विकसित जगाला कुशल मनुष्यबळाची गरज असेल व मोठ्या प्रमाणावर ते फक्त भारतातून मिळेल.’’ यावेळी सुमारे ८ हजार अनिवासी भारतीयांची उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या राजवटीत मोठे आर्थिक घोटाळे उघडकीस आले होते. मोदी यांनी घोटाळ्यांचा उल्लेख करताच समुदायातून जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला. स्टीफन हार्पर यांनी मोदी यांचे रिको कोलिसेयुम येथे समारंभपूर्वक स्वागत केले. अनेक दशकांपासून कॅनडात स्थायिक झालेले भारतीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या वर्षी मोदी यांनी न्यूयॉर्क शहरातील मेडिसन स्क्वेअरमध्ये भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची यावेळी आठवण झाली.
1 ‘ज्यांना घाण करायची होती, ते ती घाण करून गेले, आता आम्ही स्वच्छता करणार’ या मोदी यांच्या कॅनडातील वक्तव्यावर काँग्रेसने गुरुवारी जोरदार टीका केली. परदेशी भूमीवर असे वक्तव्य पंतप्रधानांना शोभणारे नाही. अद्यापही निवडणूक प्रचार मोहिमेच्या प्रभावातून ते बाहेर पडलेले नाहीत, हेच यावरून दिसते, अशा शब्दांत काँग्रेसने लक्ष्य केले. काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मोदींच्या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
2 जर्मनी व कॅनडा दोन्ही ठिकाणी पंतप्रधान जे बोलले ते त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. भारताच्या इतिहासात आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने यापूर्वी हे केले नाही. ते सत्तेत येण्यापूर्वी जणू देश केवळ भ्रष्टाचार व घोटाळ्यांसाठीच ओळखला जात होता, अशा तोऱ्यात मोदी बोलत आहेत, असे शर्मा म्हणाले.
४मोदी म्हणाले, पंतप्रधान झाल्यापासून दहा महिन्यांत लोकांची मानसिकता बदलली आहे. आता विश्वासाचे वातावरण आहे. स्वच्छ भारत मोहिमेत नागरिक सक्रिय सहभाग घेत आहेत.
श्रीमंत लोक स्वत:हून घरगुती गॅसवरील अनुदान घेणे बंद करीत आहेत व गरीब नागरिकांसाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहे.’’