हवा नव्हे नाकावाटे विषच, प्रदूषणात भारत जगात तिसरा; दिल्ली ठरले सर्वात प्रदूषित शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 02:59 PM2024-03-20T14:59:59+5:302024-03-20T15:01:19+5:30
६६ शहरांत प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषण; भारतातील अब्जावधी लोकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वांत प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे. हा निष्कर्ष नव्या पाहणीतून काढण्यात आला आहे. याआधीही दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर असल्याची नोंद झाली होती. जगभरात २०२३ या वर्षात १३४ देशांपैकी सर्वात प्रदूषित हवा असलेल्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर या संस्थेने २०२३ या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे.
नऊपैकी १ मृत्यू प्रदूषित हवेमुळे हवेच्या दर्जाची तपासणी करणारी ३० हजारांहून अधिक केंद्रे व संशोधन संस्थेमार्फत संचालित होणारी हवेच्या दर्जाच्या मापनाची सेन्सर, विविध सरकारी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या आयक्यू एअरचा २०२३ चा अहवाल तयार करण्यात सहभागी झाल्या होत्या.
जगात होणाऱ्या दर नऊ मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषित हवेमुळे होतो. जगात दरवर्षी सत्तर लाख लोकांचा प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
भारतातील अब्जावधी लोकांना फटका
अहवालात २०१८ सालापासून जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचा आजवर चारवेळा उल्लेख करण्यात आला आहे. भारतातील १.३६ अब्ज लोक हवेतील २.५ पीएम पातळीत प्रति घनमीटर वाढलेल्या प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत. भारतातील ६६ टक्के शहरांमध्ये प्रति घनमीटर ३५ मायक्रोग्रॅम्स इतके वार्षिक सरासरी प्रमाण आहे.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे
१. बेगुसराय (भारत)
२. गुवाहाटी (भारत)
३. दिल्ली (भारत)
४. मुल्लनपूर (भारत)
५. लाहोर (पाकिस्तान)
६. सिवान (भारत)
७. सहर्सा (भारत)
८. गोसाईगाव (भारत)
९. कटिहार (भारत)
सर्वाधिक स्वच्छ हवा कुठे?
क्रमांक देश २.५ पीएम
१३४ फ्रेंच पॉलिनेशिया ३.२
१३३ मॉरिशस ३.५
१३२ आइसलँड ४.०
१३१ ग्रेनेडा ४.१
१३० बर्म्युडा ४.१
१२९ न्यूझीलंड ४.३
१२८ ऑस्ट्रेलिया ४.५