आता कॅनडाच्या आकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, अमेरिकन लढाऊ विमानांनी पाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 09:29 AM2023-02-12T09:29:06+5:302023-02-12T09:29:55+5:30
Canada: अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशामध्ये शनिवारी एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ही वस्तू दिसून येताच अमेरिकन फायटर जेटनी आकाशात झेप घेत तिला नष्ट केले.
अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशामध्ये शनिवारी एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ही वस्तू दिसून येताच अमेरिकन फायटर जेटनी आकाशात झेप घेत तिला नष्ट केले. याआधी एक दिवसापूर्वीच अमेरिकेतील अलास्का येथे एक संशयास्पद वस्तू दिसून आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी आदेश दिल्यानंतर अमेरिकन लढाऊ विमान एफ-२२ ने ही संशयास्पद वस्तू नष्ट केली. ट्रुडो यांनी ट्विट करत उत्तर अमेरिकेवर लक्ष ठेवण्यासाठी NORD चे आभार मानले.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संशयास्पद वस्तू कॅनडामधील युकोनच्यावर उडत होती. यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन एफ-२२ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती. त्यामधील एकाने Aim9X क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे ही संशयास्पद वस्तू खाली कोसळली. कॅनडाच्या संरक्षणमंत्री अनिता आनंद यांनी दोन्ही देशांच्या संयुक्त कारवाईची प्रशंसा केली आहे. आम्ही एकत्रितपणे आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करू, याला दोन्ही देशांनी दुजोरा दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्विट करून लिहिले की, मी कॅनडाच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करणाऱ्या एका अज्ञात वस्तूला हटवण्याचा आदेश दिला होता. @NORADCommand ने युकोनच्यावर उडलेल्या वस्तूला पाडले आहे. गोळीबारासाठी कॅनडा आणि अमेरिकेमध्ये विमानांना पाठवण्यात आले. त्यांनी ही संशयास्पद वस्तू पाडली. एका अन्य ट्विटमध्ये ट्रुडो यांनी लिहिले की, मी आज दुपारी राष्ट्रपती बाडयेन यांच्याशी चर्चा केली आहे. कॅनडाचे सैन्य आता या वस्तूचे अवशेष ताब्यात घेऊन त्यांचे विश्लेषण करणार आहे.
याआधी अमेरिकी जेट विमानांनी हेरगिरी करणारा एक चिनी फुगा नष्ट केला होता. ही संशयास्पद वस्तू अलास्का येथे पाडली होती. ही संशयास्पद वस्तू अलास्कामध्ये ४० हजार फूट उंचावरून उडत होती.