आता तुटलेले दात नैसर्गिकरीत्या परत येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:44 AM2023-09-28T10:44:34+5:302023-09-28T10:45:28+5:30
जपानच्या शास्त्रज्ञांची कमाल
टोकियो : अनेकदा खेळताना किंवा अपघातात आपले दात तुटून जातात. त्या ठिकाणी नवे दात येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता एका औषधामुळे नवीन दात येण्यास मदत होणार आहे. हे असे पहिलेच औषध असेल ज्याने नैसर्गिक स्वरूपात दात येतील. जपानचे संशोधक या औषधावर काम करत आहेत. सर्व वयोगटातील लोकांवर हे औषध प्रभावी ठरेल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ज्या लोकांचे दात खराब झाले आहेत त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे.
जपान टाइम्स वृत्तानुसार, हे औषध क्योटो विद्यापीठाच्या टोरेगेम बायोफार्मामध्ये विकसित केले जात आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये शास्त्रज्ञ त्याची चाचणी घेतील. चाचणी यशस्वी झाल्यास २०३० पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होईल. मानव व प्राण्यांना दातांच्या समान बड्स असतात. यामुळे मुलांमध्ये नवीन दात तयार करण्याची क्षमता असते. वयानुसार, बड्स विकसित होत नाहीत व शेवटी संपून जातात. बायोफार्माने यासंदर्भात अँटिबॉडी औषध विकसित केले आहे. हे औषध दातांच्या बड्स विकसित होण्यास अडथळा ठरणाऱ्या प्रथिनांना रोखून धरते.
प्राण्यांवर यशस्वी प्रयोग
२०१८ मध्ये, शास्त्रज्ञांनी फेरेट या मुंगूस प्रजातीच्या प्राण्याला अँटिबॉडी औषध दिले होते. यामुळे नवीन दात यशस्वीपणे विकसित झाले. माणसांप्रमाणेच, फेरेटचे दातही लहानपणी पडतात आणि नंतर नव्याने येतात.
दात पडल्याने काय होते?
चाचणीचा भाग म्हणून मुलांना दातांच्या विकासाला चालना देण्यासाठी इंजेक्शन दिली जातील. टोरेजेम बायोफार्माचे सहसंस्थापक आणि ओसाका येथील किटानो हॉस्पिटलमधील दंतचिकित्सक कात्सु ताकाहाशी यांनी सांगितले की, मुलाचे दात पडल्यामुळे त्याच्या जबड्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. अशा समस्या सोडवण्यात हे औषध महत्त्वाची भूमिका बजावेल.