वाचनीय लेख - आता चॅटजीपीटी सरकारही चालवणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:22 AM2023-04-28T06:22:21+5:302023-04-28T06:23:11+5:30

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओपन एआय, चॅटजीपीटीच्या कारणावरून जग असंच दोन भागात वाटलं गेल्याचं दिसतंय.

Now ChatGPT will also run the government! | वाचनीय लेख - आता चॅटजीपीटी सरकारही चालवणार !

वाचनीय लेख - आता चॅटजीपीटी सरकारही चालवणार !

googlenewsNext

भारतात जेव्हा कॉम्प्युटर युगाची सुरुवात झाली तो काळ आठवतो? माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या पुढाकारानं आणि सॅम पित्रोदा यांच्या सहकार्यानं भारतात संगणकयुगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातच संगणकावरून मतभेद होते. संगणकांचा वापर करावा की करू नये याबाबत अक्षरश: संपूर्ण जगच जणू काही दोन भागांत वाटलं गेलं होतं. एका गटाचं म्हणणं होतं, संगणकांचा मोठ्या प्रमाणात सरकारी, खासगी कार्यालयांत वापर करू नये. त्यामुळे लक्षावधी कामगार बेरोजगार होतील, त्यांचे संसार उद‌्ध्वस्त होतील. जग जर वाचवायचं असेल आणि जगभरातल्या सरकारांची सद्सदविवेकबुद्धी जागी असेल तर संगणकांचा वापर अत्यंत मर्यादित ठेवावा. त्याच वेळी दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं, संगणक म्हणजे नव्या युगाची पहाट आहे. संगणकांमुळे अनेक गोष्टी अतिशय झटपट, बिनचूक होतील आणि मानवी चुका, मानवी मर्यादा यात टाळल्या जातील. जग पुढे न्यायचं असेल तर संगणकांचा वापर वाढवायलाच हवा. त्यामुळे लोकांचा रोजगार बुडणार नाही, तर रोजगाराच्या अनेक नव्या संधी तयार होतील..

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओपन एआय, चॅटजीपीटीच्या कारणावरून जग असंच दोन भागात वाटलं गेल्याचं दिसतंय. काहींचं मत आहे की, ओपन एआय चॅटजीपीटीमुळे लोकांचे मेंदू बथ्थड होतील, लोक आपल्या मेंदूचा वापर करणं बंद करतील, याशिवाय चॅटजीपीटीच्या वापरामुळे ज्या अनेक नैतिक समस्या उभ्या राहातील, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं आयुष्यच उद्ध्वस्त होईल. अर्थातच वास्तवात घडलेल्या काही कहाण्यांचा आधारही त्यामागे आहे. त्याचवेळी चॅटजीपीटीचा वापर कसा अनिवार्य आहे आणि किती नवनव्या संधी या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिल्या आहेत, याची यादी वाचताना त्याचे समर्थक थकत नाहीत. चॅटजीपीटी तसं अजूनही अतिशय बाल्यावस्थेत आहे. चॅटजीपीटी अस्तित्वात येऊन उण्यापुऱ्या पाच महिन्यांचा काळ फक्त उलटला आहे, तरीही त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. 

चॅटजीपीटीच्या वापरामागे दोन्ही बाजू आहेत. त्याचा वापर आपण कशा पद्धतीनं करतो, त्यावर बरंच काही अवलंबून आहे. सध्या तरी जपानसारख्या देशांनी चॅटजीपीटीचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घ्यायला सुरुवात केली आहे. अर्थातच त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ‘म्हाताऱ्यांचा देश’ ही जपानची ओळख. आपल्या देशाची तरुण लोकसंख्या वाढवण्यासाठी जपान अथक प्रयत्न करीत आहे, पण अजून तरी त्यांना त्यात यश आलेलं नाही. त्यामुळे ‘सरकार चालवण्यासाठी’ जपाननं आता अधिकृतरीत्या चॅटजीपीटीचा वापर करायला सुरुवात केली आहे. जपानच्या कानागावा प्रांतातील योकोसुका या शहरात आपल्या कामांसाठी अधिकृतपणे चॅटजीपीटीला कामाला लावलं आहे. या शहरातील सर्वच्या सर्व चार हजार सरकारी कर्मचाऱ्यांना त्याबाबत आदेश देण्यात आले आहेत आणि दैनंदिन व्यवहारात चॅटजीपीटीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कामांसाठी पुरेसे कर्मचारी नसल्यानेच चॅटजीपीटीचा पर्याय शोधण्यात आला आहे. विशेषत: प्रशासनिक कामे चॅटजीपीटीच्या मार्फत आता करवून घेतली जातील. त्यामुळे योकोसुका हे जपानमधलं पहिलं शहर ठरलं आहे, ज्यानं अधिकृतरीत्या चॅटजीपीटीचा वापर प्रशासन चालवण्यासाठी करून घेतला आहे. 

योकोसुका शहराचे जनसंपर्क प्रतिनिधी ताकायुकी सामुकावा यांनी स्पष्टच सांगितलं, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि प्रशासनिक आव्हानं पूर्ण करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर आमच्यासाठी अनिवार्य होतं. अर्थात चॅटजीपीटीचा प्रशासनात वापर करणारं योकोसुका हे जपानचं पहिलं शहर ठरलं असलं तरी संपूर्ण जपानमध्येही लवकरच त्याचा वापर होऊ शकतो, असे संकेत आहेत. ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर या हालचाली आणखी गतिमान झाल्या आहेत. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांचं म्हणणं आहे, चॅटजीपीटीच्या सुरक्षेसंदर्भात आमचे काही प्रश्न आहेत. त्यांचं निराकारण झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा वर्कलोड कमी करण्यासाठी देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांबाबत हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

ताकही फुंकून पिण्याकडे कल! 
चॅटजीपीटीच्या वापराबाबत संपूर्ण जगातच मतभेद आहेत. काही देशांनी आताच चॅटजीपीटीवर कठोर निर्बंध लादले आहेत. अनेक देश याबाबत ताकही फुंकून फुंकून पित आहेत. जेपी मॉर्गनसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटी वापरण्यावर बंदी आणली आहे. अनेक टेक कंपन्यांनी याबाबत सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे.

Web Title: Now ChatGPT will also run the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.