तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:28 AM2020-07-09T08:28:43+5:302020-07-09T08:29:54+5:30
4 जुलै रोजी चिनी जहाज व्हिएतनामच्या उत्तरेकडील व्हँगार्ड किना-यावर पोहोचले आणि तेव्हापासून तेथे सतत गस्त घालत आहे.
वॉशिंग्टनः पूर्व लडाखमध्ये भारताशी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीनला समुद्रात अमेरिकेच्या घातक युद्धनौका आणि लडाखच्या पर्वतराजीत भारतानं आपली एकसो एक लढाऊ विमानं तैनात करून चीनला घेरलं होतं. त्यानंतर चिनी सैन्य लडाख सीमेवरच्या वादग्रस्त क्षेत्रातून २ किलोमीटर मागे गेले आहे. भारतासोबतचा वाद शांत होत नाही, तोच चीन आता व्हिएतनामला उकसावू लागला आहे. अलीकडेच चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजाला दक्षिण चीन समुद्रातील व्हॅंगार्ड किना-यावर पाहिले गेले, या भागावरून व्हिएतनामचा चीनशी वाद सुरू आहे.
सोमवारी व्हिएतनामच्या तेलाच्या क्षेत्राच्या 30 नॉटिकल मैलांच्या अंतरावर दक्षिण चीन समुद्रात चीनी तटरक्षक दलाचे जहाज 5402 पाहिले गेले. हे चिनी जहाज ब्लॉक क्रमांक 06.01 जवळ दिसले. जे व्हिएतनामने रशियन तेल कंपनी रोसनेफ्टला दिलेलं आहे. गेल्या आठवड्याभरात व्हिएतनामच्या भागात चिनी जहाजे दिसण्याची ही दुसरी घटना आहे. चीनच्या या पावलामुळे दक्षिण चीन समुद्रातील दोन आशियाई देशांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. चिनी कोस्ट गार्ड जहाज हानान प्रांतातील सान्या बंदरातून १ जुलै रोजी निघाले. ते 2 जुलै रोजी चीनच्या सर्वात मोठ्या कृत्रिम बेटावरील सुबी रीफवर थांबले होते. 4 जुलै रोजी चिनी जहाज व्हिएतनामच्या उत्तरेकडील व्हँगार्ड किना-यावर पोहोचले आणि तेव्हापासून तेथे सतत गस्त घालत आहे. व्हिएतनाम सरकारकडून सध्या या जहाजाच्या उपस्थितीबद्दल कोणतेही विधान झाले नाही.
पारासेल बेटाजवळ केला होता युद्धाभ्यास
गेल्या आठवड्यात चीनने व्हिएतनाम आणि चीनमधील आणखी एक वादग्रस्त क्षेत्र असलेल्या पारासेल बेटाजवळ युद्धसराव केला होता. व्हिएतनामने यावर तीव्र निषेध व्यक्त केला होता. चीन दक्षिण चीन समुद्रात आक्रमक भूमिका घेत आहे. यामागील हेतू असा आहे की, या क्षेत्रातील व्यावसायिक हालचाली आंतरराष्ट्रीय कंपन्यांद्वारे नव्हे, तर केवळ चिनी भागीदारांनीच केल्या जाव्यात ही चीनची मनीषा आहे.