आता नकोशा प्रेग्नंसीची भीती नको, पुरुषांचं स्पर्म रोखण्याचं काम करेल ही गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:16 PM2022-03-25T23:16:26+5:302022-03-25T23:26:14+5:30
Health Tips: आतापर्यंत केवळ महिलांसाठीच मार्केटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिळत होत्या. मात्र आता शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवल्या आहेत. ज्या ९९ टक्क्यांपर्यंत प्रेग्नंसी रोखण्यास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली - आतापर्यंत केवळ महिलांसाठीच मार्केटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिळत होत्या. मात्र आता शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवल्या आहेत. ज्या ९९ टक्क्यांपर्यंत प्रेग्नंसी रोखण्यास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. उंदरांवर या गोळीची चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. शास्त्रज्ञांनी या नॉन हार्मोनल ड्रग्सचं नाव YCT529 ठेवलं आहे. YCT529 ची मात्रा सुमारे चार आठवड्यांपर्यंत उंदरांना देण्यात आली. चार आठवड्यांनंतर या गर्भनिरोधकाचा प्रयोग थांबवल्यावर उंदरांना पुन्हा पिल्ले झाली.
उंदरांवर चाचणी घेतल्यानंतर मिनिसोटा विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आता या नॉन हार्मोनल ड्रग्सच्या ह्युमन ट्रायलची प्लॅनिंग करत आहेत. या ड्रग्समधून पुरुषांच्या शरीरामध्ये एक प्रकारच्या प्रोटिनला रोखले जाते. त्यामुळे शुक्राणूंना रोखता येऊ शकते. तत्पूर्वी ब्रिटनमध्येही पुरुषांवर गर्भनिरोधक गोळ्यांचे परीक्षण करण्यात आले होते. मात्र या शोधाचे नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापिका गुंडा जॉर्ज यांनी सांगितले की, हा YCT529 नॉन हार्मोनल ड्रग पुरुषांसाठी खूप परिणामकारक आहे.
१९५० पासूनच शास्त्रज्ञ पुरुषांसाठी गोळ्या, जेल आणि इंजेक्शनसारख्या गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आतापर्यंत यामधील कुणालाही मान्यता मिळालेली नाही. यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या ओव्युलेशनला रोखण्याचं काम करतात. ते महिन्यातून एकदाच होते. मात्र लाखो शुक्राणूंचे उत्पादन रोखण्यासाठी पुरुषांना या गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन रोज करावे लागेल.