आता रशियाचीही पाकला साथ
By Admin | Published: July 6, 2015 11:23 PM2015-07-06T23:23:10+5:302015-07-06T23:23:10+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मित्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने प्रथमच पाकिस्तानच्या बाजूने कौल दिला आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मित्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने प्रथमच पाकिस्तानच्या बाजूने कौल दिला असून, चीनसारख्या देशाच्या पावलावर पाऊल टाकत घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय नेते चक्रावले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात मांडलेल्या निंदा ठरावाला समर्थन देण्यास रशियाने नकार दिला आहे. रशियाचा हा निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे परराष्ट्र धोरण यांना चांगलाच झटका असल्याचे मानले जात आहे. याआधी चीननेही असाच निर्णय घेत भारताला तोंडघशी पाडले होते.
दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीसंदर्भात आॅस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे अलीकडेच एक परिषद आयोजित केली होती. त्या बैठकीत भारताने दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली.
पाकिस्तानविरोधात भारताने निंदाव्यंजक ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने मत देण्यास आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी नकार दिला; पण रशिया या सार्वकालिक भारताच्या मित्रानेही नकार दिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
रशियाने पाकला समर्थन देण्याची भूमिका का घेतली असावी यासंदर्भात आता वेगवेगळी गणिते मांडली जात असून, त्यातील एका विश्लेषणानुसार रशियाला अफगाणिस्तानमधील ड्रग व्यवसाय व अफगाण-पाक सीमेवरील दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पाकची साथ हवी आहे, त्यामुळे आता पाकला दुखवून चालणार नाही या हिशोबान रशियाने पाकच्या विरोधातील ठरावास समर्थन देण्यास नकार दिला आहे.