शंभर वर्षांची योजना... आता पृथ्वीवरून चंद्र-मंगळावर बुलेट ट्रेन!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:28 AM2022-07-26T10:28:19+5:302022-07-26T10:29:15+5:30
जपानची क्योटो युनिव्हर्सिटी आणि काजिमा कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त उपक्रमातून नजीकच्या भविष्यात ही याेजना साकारली जाणार आहे.
एखादा ‘साय-फाय’ मूव्ही तुम्ही पाहिलाय? अशा चित्रपटांना विज्ञानाचा ‘आधार’ असतो, तरीही ते काल्पनिक असतात. भविष्यात विज्ञान कुठंपर्यंत झेप घेऊ शकतं याचा अंदाज घेऊन असे चित्रपट बनवले जातात. अनेक लेखकांनी अशा प्रकारच्या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यावेळी फक्त कल्पनेच्या पातळीवर असलेल्या आणि लोकांना अतिशय आश्चर्यजनक, ‘कविकल्पना’ वाटलेल्या या गोष्टीनंतर प्रत्यक्षात साकारही झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या एका गोष्टीबद्दल आता जगभरात चर्चा सुरू आहे. बुलेट ट्रेनबद्दल आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. अतिशय वेगवान अशा या बुलेट ट्रेन अनेक देशांत सध्या धावताहेत. पण अशाच प्रकारची आणि त्याहूनही अत्याधुनिक अशा बुलेट ट्रेन आता पृथ्वीपासून चंद्रापर्यंत आणि मंगळापर्यंत धावणार आहेत. - का ही ही.. कसं शक्य आहे हे? आश्चर्यानं तुमची बोटं तोंडात गेली असतील ना? अर्थात, हा काही ‘साय-फाय’ मूव्ही नाही, एखादी कादंबरी नाही की कविकल्पनाही नाही. ही घटना प्रत्यक्षात घडणार आहे. जपाननं या योजनेवर नुकतंच काम सुरू केलं आहे आणि तशी जाहीर घोषणाही केली आहे.
जपानची क्योटो युनिव्हर्सिटी आणि काजिमा कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त उपक्रमातून नजीकच्या भविष्यात ही याेजना साकारली जाणार आहे. अंतराळातील हा प्रवास आणि अधिवासासाठी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण, वातावरण इत्यादी गोष्टी कृत्रिम पद्धतीनं तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा आंतरग्रहीय प्रवास करणाऱ्या लाेकांना तो अगदी ‘होमली’, नेहेमीसारखा वाटेल. जपानी संशोधकांनी तयार केलेल्या या वाहतूक व्यवस्थेला ‘हेक्झाट्रॅक’ असं नाव देण्यात आलं आहे. या बुलेट ट्रेनमध्ये षटकोनी आकाराच्या कॅप्सूल्स असतील. त्यांना ‘हेक्सोकॅप्सूल’ असं म्हटलं जातं. या कॅप्सूलमध्ये मध्यभागी एक हलणारं उपकरण असेल. वातावरणात असलेल्या कमी गुरुत्वाकर्षणाचे दुष्परिणाम जाणवू नयेत यासाठी या संपूर्ण प्रवासात सगळीकडे सारख्या प्रमाणातील गुरुत्वाकर्षण कृत्रिमरीत्या राखले जाणार आहे. जपानी संशोधकांनी जो प्रस्ताव दिला आहे, त्यानुसार १५ मीटर त्रिज्या असलेली एक मिनी कॅप्सूल पृथ्वी आणि चंद्र यांना जोडली जाईल. चंद्र आणि मंगळ यांना जोडण्यासाठी ३० मीटर त्रिज्या असलेल्या कॅप्सूलची आवश्यकता असेल. जर्मनी आणि चीनमध्ये सध्या ज्या अति वेगवान ‘मॅग्लेव्ह’ ट्रेन धावतात, त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याच तंत्रज्ञानाचा वापर या कॅप्सल्ससाठी केला जाईल. ह्यूमन स्पेसोलॉजी सेंटरच्या मते, चंद्रावरील स्टेशन लुनार स्टेशन म्हणून, मंगळावरील स्टेशन मार्स स्टेशन म्हणून तर पृथ्वीवरील स्टेशन टेरा स्टेशन म्हणून ओळखले जाईल. स्पेस एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाणारी ही ट्रेन स्टँडर्ड गेज ट्रॅकवर चालेल.
बहुतेक अंतराळ वाहतूक प्रणाली पृथ्वीवरील नैसर्गिक रचनेचे महत्त्व दुर्लक्षित करतात. तथापि, क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी जी योजना तयार केली आहे, त्यात पृथ्वीवर ज्या सुविधा मिळतात, जे नैसर्गिक वातावरण मिळतं, तशाच प्रकारचा अधिवास आणि अनुभूती प्रवाशांना या प्रवासात मिळेल. टप्प्याटप्प्यानं ही योजना विकसित होत जाईल. अंतराळात राहाण्यासाठी आणि अंतराळातील प्रवासासाठी सुयोग्य प्रकारची संरचना तयार करणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. एका कोनाच्या आकाराच्या असलेल्या या संरचनेला ‘ग्लास’ असं नाव देण्यात आलं आहे. वनस्पती, झाडं, पाणी, ट्रान्स्पोर्ट सिस्टिम.. इत्यादी गोष्टीही या ठिकाणी विकसित केल्या जाणार आहेत.
कॉस्मॉलॉजी रिसर्च सेंटरचे संचालक आणि क्योटो विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ॲडव्हान्स इंटिग्रेटेड स्टडीजचे योसुके यामाशिकी यासंदर्भात म्हणतात, भविष्यात मानवी अवकाश वसाहती साकारण्यासाठी सध्या जे काही केलं जात आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. जपान आज या क्षेत्रात करीत असलेली पायाभरणी भविष्यातील अंतराळ वसाहतीसाठी मैलाचा दगड ठरेल.
शंभर वर्षांची योजना!
जपानच्या ‘द असाही शिम्बून’नुसार अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. हजारो शास्त्रज्ञ अनेक वर्षे या योजनेवर अविरत मेहनत घेतील. ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी सुमारे एक शतकाचा कालावधी लागू शकतो. तथापि, २०५० पर्यंत मार्सग्लास आणि लुनारग्लासची सरलीकृत प्रोटोटाइप आवृत्ती तयार करण्याचे संशोधकांचे लक्ष्य आहे.