आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 21:22 IST2024-12-09T21:21:44+5:302024-12-09T21:22:39+5:30
बशर अल-असद यांच्या तुरुंगातून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे...

आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर
सीरियाचे माजी राष्ट्रापती बशर अल असद यांनी देश सोडल्यानंतर, एकीकडे त्यांनी तयार केलेल्या तुरुंगांच्या कहाण्या आणि व्हिडिओ समोर येत आहेत. तर दुसरीकडे, बंडखोरांनी सीरिया आणि आसपास दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसमधील सय्यदनाया तुरुंगातून सीरियन बंडखोरांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या 678 दहशतवाद्यांची सुटका केली आहे. यांपैकी 65 दहशतवादी फाशीच्या प्रतीक्षेत होते. बशर अल-असद यांच्या तुरुंगातून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे, तुरुंगातून सुटलेले हमासचे अनेक दहशतवादी हे स्थानिक पातळीवरील मोठे कमांडर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, सीरियन बंडखोरांना बशर अल-असद यांनी केलेल्या दडपशाहीचे व्हिडिओ जगासमोर आणून, त्यांना खलनायक ठरवायचे आहे. याच बरोबर, तुरुंगात असलेल्या सर्वांची तत्काळ मुक्त करायचे आहे. यामुळे पुढील काही आठवडे सीरियामध्ये दहशतीचे वातावरण राहणार आहे. कारण जोपर्यंत तेथे सरकारच्या नावाने कोणी ताबा मिळवत नाही, तोवर दहशत आणि बंदुकीचे राज्य असणार आहे. हाहाकार असणार आहे.
इस्रायलनं नष्ट केली शस्त्रास्त्रे -
दरम्यान, अमेरिकन हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसह सीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत. सीरियतील ही शस्त्रास्त्रे बंडखोरांच्या हाती पडण्याची भीती अमेरिका आणि इस्रायलला वाटत होती. यामुळे त्यांनी ही कारवाई केली.
गोलन हाइट्सजवळच्या 10 किमी परिसरावर इस्रायलचा कब्जा -
तसेच, दुसरीकडे, इस्रायली सैन्याने सीरियाच्या सीमेतही प्रवेश केला आहे. 1974 च्या करारानंतर इस्त्रायलने सीरियाच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर, इस्त्रायली सैन्याने सीरियन सीमेत गोलन हाइट्सजवळच्या 10 किमी परिसरावर कब्जा करून त्याचे बफर झोनमध्ये रूपांतर केले आहे. यासंदर्भात भाष्य करताना इस्रायलने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा हवाला दिला आहे. तसेच हे पाऊल काही काळासाठीच उचलण्यात आले असल्याचेही इस्रायलने म्हले आहे.