बांगलादेशवर एनआरसीचा परिणाम नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 06:10 AM2020-03-03T06:10:08+5:302020-03-03T06:10:29+5:30
राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही,
ढाका : राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन सोमवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बांगलादेशला दिले.
गेल्या वर्षी भारतीय संसदेने नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन आणि गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी भारताचा डिसेंबरमध्ये होणारा दौरा रद्द केला होता. आसाममध्ये एनआरसी उपलब्ध केल्यानंतर बांगलादेशने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे भारताने एनआरसीचा विषय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत असल्याचे त्याला कळवले होते.
नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक (सीएबी) आणि एनआरसी संमत झाल्यानंतर शेजारच्या देशाला भेट देणारे शृंगला हे पहिलेच अत्यंत वरिष्ठ भारतीय अधिकारी आहेत. सीएएनुसार भारत काही बांगलादेशी स्थलांतरितांना देशात पाठवू शकेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यांतर बांगलादेशने काळजी व्यक्त केली होती. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एनआरसीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केला
होता. (वृत्तसंस्था)
>हा तर भारताचा अंतर्गत विषय
एनआरसी अद्ययावत करणे ही प्रक्रिया पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे शृंगला यांनी म्हटले. एनआरसीमुळे बांगलादेशचे लोक आणि बांगलादेशवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे आश्वासन शृंगला यांनी ‘बांगलादेश अँड इंडिया : ए प्रॉमिसिंग फ्युचर’ चर्चासत्रात बोलताना सांगितले. शृंगला ढाकामध्ये भारताचे उच्चायुक्त होते.