‘एनएसजी सदस्यत्वाचा मुद्दा अजेंड्यावर नाही’
By admin | Published: June 21, 2016 07:28 AM2016-06-21T07:28:32+5:302016-06-21T07:28:32+5:30
आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सोलमध्ये होणाऱ्या नियोजित बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे चीनने सोमवारी स्पष्ट केले.
बीजिंग : आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सोलमध्ये होणाऱ्या नियोजित बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे चीनने सोमवारी स्पष्ट केले. ४८ देशांच्या या गटाचे सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी चीनच्या दृष्टीने सविस्तर वाटाघाटी अजून व्हायच्या आहेत, असे संकेत यातून मिळतात.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग म्हणाल्या की, ‘अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) अजूनही ज्या देशांनी (त्यात भारतही आहे) स्वाक्षरी केलेली नाही, त्यांना या गटाचे सदस्यत्व देण्याचा प्रश्न सोल बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही.’
नवी दिल्लीत परराष्ट्र
मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, ‘प्रसारमाध्यमांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्वासंदर्भात अनावश्यक तर्क करू नयेत. उलट येत्या दिवसांत वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या घडामोडी घडतील, तोपर्यंत वाट बघावी.’