श्रीलंकेच्या आगीतील मृतांची संख्या ११ वर
By admin | Published: April 16, 2017 12:28 AM2017-04-16T00:28:25+5:302017-04-16T00:28:25+5:30
श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोजवळ खुल्या जागेतील एका कचरा डेपोला लागलेल्या आगीत शनिवारी आणखी पाच जण मृत्युमुखी पडले.
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोजवळ खुल्या जागेतील एका कचरा डेपोला लागलेल्या आगीत शनिवारी आणखी पाच जण मृत्युमुखी पडले. त्याबरोबर मृतांची संख्या आता ११ झाली आहे. मृतांत चार मुलांचा समावेश आहे.
कोलोन्नावा येथील मीठोतमुल्ला येथे ही घटना घडली. विशाल परिसरात पसरलेल्या या कचरा डेपोला आग लागल्यामुळे सुमारे ५0 ते १00 घरे पूर्णत: जळून खाक झाली आहेत. तसेच १८0 लोक निर्वासित झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शुक्रवारी डेपोला लागलेली ही आग शनिवारीही धुमसत होती. कचरा डेपोतील कचऱ्याचा ढिगारा तब्बल ३00 फूट उंच असून हा संपूर्ण परिसर झोपड्यांनी वेढलेला आहे. झोपडपट्टीवासीयांच्या सुटकेसाठी श्रीलंका सरकारने लष्कराला पाचारण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४00 जवान मदत व सुटका कार्यात गुंतले आहेत. आतापर्यंत चार मुलांसह एकूण ११ लोक त्यात मृत्युमुखी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल श्रीलंकेत पारंपरिक नवे वर्ष सुरू झाले. त्याचा उत्सव सुरू असताना कचऱ्याच्या या डोंगराला आग लागली. आगीचा मोठा गोळा उत्सवात मग्न असलेल्या झोपडपट्टीवासीयांवर कोसळला. परिसरात आणखी काही लोक अडकलेले असू शकतात, अशी भीती एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यांच्या शोधाचे काम लष्कर करीत आहे. आग विझविण्यासाठी हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर कामाला लावण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
मनुष्यनिर्मित आपत्ती
या कचरापट्टीत २३ दशलक्ष टन कचरा असून, दररोज ८00 टन कचरा ओतला जात असतो. श्रीलंकेच्या संसदेने याबाबत अलीकडेच धोक्याचा इशारा दिला होता.
कचरा डेपो अन्यत्र हलविण्याच्या मागणीसाठी स्थानिक रहिवासी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत होते. स्थानिक खासदार एम. एस. मरीक्कर यांनी सांगितले की, ही नैसर्गिक नव्हे, तर मनुष्यनिर्मित आपत्ती आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे.