इंडोनेशियातील मृतांची संख्या ३७३, १५०० हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:01 AM2018-12-25T05:01:08+5:302018-12-25T05:01:51+5:30
इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकाने आलेल्या त्सुनामीमुळे आतापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
कॅरिटा : इंडोनेशियातज्वालामुखीच्या उद्रेकाने आलेल्या त्सुनामीमुळे आतापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो म्हणाले की, मृतांची संख्या आणि नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियातज्वालामुखीच्या उद्रेकानंतर दक्षिण सुमात्रा आणि पश्चिम जावाजवळ समुद्राच्या उंच लाटा किनाऱ्याला पार करून पुढे सरकल्या. यात शेकडो घरे नष्ट झाली. आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी डोडी रुसवांडी यांनी सांगितले की, सैन्य आणि पोलीस ढिगाºयांखाली तपास करत आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी सोमवारी या भागाला भेट दिली. वैज्ञानिकांचे असे मत आहे की, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने समुद्राखाली झालेल्या हालचालींमुळे त्सुनामी आली असावी. भूगर्भीय एजन्सीच्या मते, या भागात गत काही दिवसांत काही वेगळे होत असल्याचे संकेत मिळत होते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये पालू शहरात आलेल्या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)
मृतांवर अंत्यसंस्कार
त्सुनामीच्या तडाख्यात सापडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. एक बँड पथक खुल्या जागेवर सादरीकरण करत असताना त्सुनामीच्या तडाख्यात ते सापडले. गिटार वाजविणारे मुहम्मद अवाल पुरबानी यांच्या नातेवाइकांना शोक अनावर झाला आहे. त्यांची तीन वर्षांची मुलगी आणि पत्नी यांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते.