बांगलादेशात हिंदूंच्या संख्येत १ टक्का वाढ
By admin | Published: June 24, 2016 12:31 AM2016-06-24T00:31:33+5:302016-06-24T00:31:33+5:30
बांगलादेशातील हिंदूंच्या लोकसंख्येत वर्षभरात एक टक्क्याची वाढ झाल्यामुळे त्यांची लोकसंख्या १.७० कोटीवर पोहोचली आहे. १९५१ नंतर देशातील हिंदूंची लोकसंख्या सतत घसरत गेली होती.
ढाका : बांगलादेशातील हिंदूंच्या लोकसंख्येत वर्षभरात एक टक्क्याची वाढ झाल्यामुळे त्यांची लोकसंख्या १.७० कोटीवर पोहोचली आहे. १९५१ नंतर देशातील हिंदूंची लोकसंख्या सतत घसरत गेली होती. २०१५ मध्ये प्रथमच हे चित्र बदलले असून, या मुस्लिमबहुल देशाच्या एकूण लोकसंख्येत हिंदू आता १०.७ टक्क्यांचे वाटेकरी झाले आहेत.
बांगलादेश सांख्यिकी विभागाने (बीबीएस) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या नमुना सांख्यिकी अहवालानुसार, डिसेंबर २०१५ पर्यंत देशाची लोकसंख्या १५.८९ कोटींवर पोहोचली असून, त्यात १ कोटी ७० लाख हिंदूंचा समावेश आहे.
बीबीएसच्या यापूर्वीच्या अहवालानुसार २०१४ मध्ये बांगलादेशातील हिंदूंची संख्या १.५५ कोटी होती. वर्षभरात तीत १५ लाखांची वाढ झाली आहे. धार्मिक आधारावर हिंदू बांगलादेशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हिंदू समाजाचे नेते समाजाच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करीत असतानाच सांख्यिकी विभागाचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. १९५१ मध्ये देशातील हिंदूंची लोकसंख्या २२ टक्के होती.
मात्र, १९७४ मध्ये ती १४ टक्क्यांवर घसरली. यानंतरही घसरण सुरूच राहिली होती. (वृत्तसंस्था)