अमेरिकेतील अण्वस्त्रांची संख्या कमी झाली, पहिल्यांदाच जगाला दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:07 PM2021-10-06T15:07:43+5:302021-10-06T15:07:53+5:30
1967 मध्ये रशियासोबत झालेल्या शीत युद्धादरम्यान अमेरिकेकडे 31,255 अण्वस्त्रे होती.
वॉशिंग्टन: चार वर्षांत प्रथमच अमेरिकेने आपल्याकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येविषयी माहिती दिली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने शस्त्रांची संख्या जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांनी अण्वस्त्रांची आकडेवारी जाहीर करण्यास बंदी घातली होती.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडून सांगण्यात आले आहे की, 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अमेरिकन सैन्याकडे 3,750 सक्रिय आणि निष्क्रिय अण्वस्त्रे आहेत. ही संख्या वर्ष 2019 च्या तुलनेत 55 आणि 2017 नंतर 77 ने कमी झाली आहे. या आकडेवारीमध्ये 1967 नंतर मोठी घट झाली आहे. 1967 मध्ये रशियाबरोबर झालेल्या शीत युद्धादरम्यान अमेरिकेकडे एकूण 31,255 अण्वस्त्रे होती.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना अण्वस्त्राच्या नियंत्रणावर रशियाशी पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. ट्रम्प यांच्या काळात अशा चर्चेवर बंदी होती. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या जाहीर केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला इराणसोबतच्या आण्विक करारातून बाहेर काढले होते. यासह, ट्रम्प यांच्या कार्यकाळात रशियाबरोबर इंटरमीडिएट-रेंज न्यूक्लिअर फोर्सेस (INF) करारातूनही अमेरिका बाहेर झाली होती. याशिवाय, अमेरिकेने रशियाबरोबरचा आणखी एक संवेदनशील न्यू स्टार्ट करार स्वीकारण्यासही नकार दिला होता.