हिमवादळ बळींची संख्या ३०; मृतांत तीन भारतीय
By admin | Published: October 22, 2014 05:16 AM2014-10-22T05:16:39+5:302014-10-22T05:16:39+5:30
नेपाळच्या हिमालय पर्वतराजीत आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात भयंकर हिमवादळातील बळींची संख्या वाढून ३० झाली असून मृतांत तीन भारतीयांचा समावेश आहे.
काठमांडू : नेपाळच्या हिमालय पर्वतराजीत आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात भयंकर हिमवादळातील बळींची संख्या वाढून ३० झाली असून मृतांत तीन भारतीयांचा समावेश आहे.
गुरुवारी मदत व बचाव मोहीम सुरू झाल्यानंतर मनांग जिल्ह्यातील नारखू गावात दोन भारतीय गिर्यारोहकांचे मृतदेह आढळून आले. काल या भागात एका भारतीय गिर्यारोहकाचा मृतदेह मिळाला होता.
थोरांग पासजवळ मनांग जिल्ह्यात दोन कॅनेडियन व दोन भारतीयांचे मृतदेह आढळून आले, अशी माहिती ट्रेकिंग एजन्सीज असोसिएशन आॅफ नेपाळचे कोषाध्यक्ष गोपालबाबू श्रेष्ठ यांनी दिली. मुस्तांग जिल्ह्यात आणखी पाच मृतदेह आढळून आल्यामुळे हिमवादळातील बळींची संख्या वाढून ३० झाल्यास अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
कालपर्यंत या क्षेत्रात आढळलेल्या मृतदेहांची संख्या २१ होती. प्रचंड हिमवृष्टीमुळे मनांग जिल्ह्यातील तिलिचू भागात अडकून पडलेल्या १३० गिर्यारोहकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नेपाळचे लष्कर, पोलीस अधिकारी व स्थानिक गिर्यारोहक गाईड यांच्या मदतीने बचाव व मदतकार्य करण्यात येत असून या मोहिमेसाठी चार हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)