एकटं वाटणाऱ्यांची संख्या वाढली, इंग्लंडमध्ये आता 'एकेकट्यां'साठीचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 03:32 PM2018-01-18T15:32:33+5:302018-01-18T15:38:32+5:30
बदलती शहरी जीवनशैली, आधुनिक युगातील कुटुंबपद्धती, वाढलेले जीवनमान यामुळे संपूर्ण जगात एकटेपणे जगणाऱ्यांची संख्या वाढीला लागली आहे.
लंडन- बदलती शहरी जीवनशैली, आधुनिक युगातील कुटुंबपद्धती, वाढलेले जीवनमान यामुळे संपूर्ण जगात एकटेपणे जगणाऱ्यांची संख्या वाढीला लागली आहे. या एकट्याने जगणाऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. इंग्लंडने या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी चक्क स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आधुनिक जगाचे दुःखद वास्तव असल्याचं मत इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केले आहे.
मागच्या वर्षी ब्रिटिश कमिशनला इंग्लंडमध्ये नव्वद लाख लोकांना एकटेपणाचा त्रास होत असल्याचं आढळलं होतं. आपल्या समाजासमोर असणाऱ्या या एकटेपणाच्या आव्हानाला मला तोंड द्यायचं आहे. प्रिय व्यक्तीच्या जाण्यामुळे आलेलं एकटेपण, वृद्धत्वामुळं किंवा कोणीही बोलण्यासाठी नसल्यामुळे आलेलं एकटेपण अशा व्यक्तींची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यात येईल, असे इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितल्याचे न्यू यॉर्क टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या मंत्रालयाचे काम ट्रेसी क्रोच यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. एकटेपणाची समस्या जगातील बहुतांश देशांमधील नागरिकांना भेडसावत आहे. कोणत्याही समस्येपेक्षा समाजापासून अलिप्त राहण्यामुळे निर्माण होणारी समस्या वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांनी यापुर्वीच सांगितले होते. त्याचा संबंध मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगाशी असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले होते. ब्रिटनमधील वृद्ध लोकांसाठी काम करणारी सर्वात मोठी संस्था एज युकेचे प्रमुख मार्क रॉबिन्सन यांनी तर एकटेपण हे दिवसभरात 15 सिगारेट ओढण्यापेक्षाही जास्त भयंकर आहे, असे मत व्यक्त केले आहे. इंग्लंड सरकारने केलेल्या संशोधनानुसार देशातील 2 लाख लोकांनी आपले नातलग किंवा मित्रांशी महिना-महिना संपर्कात नसल्याचे दिसून आले आहे.