तिआंजिन दुर्घटनेतील बळींची संख्या १०४
By admin | Published: August 16, 2015 12:26 AM2015-08-16T00:26:52+5:302015-08-16T00:26:52+5:30
चीनमधील महत्त्वाचे बंदर तिआंजिनमध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत १०४ लोकांनी प्राण गमावले आहेत; तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तिआंजिनच्या स्फोटांनंतर
बीजिंग : चीनमधील महत्त्वाचे बंदर तिआंजिनमध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत १०४ लोकांनी प्राण गमावले आहेत; तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तिआंजिनच्या स्फोटांनंतर सुुरू असलेल्या विषारी घटकांच्या स्रावामुळे येथील लोकांना दुर्घटनास्थळापासून दूर हलविण्यास प्राररंभ झाला आहे.
स्फोटांच्या स्थळाजवळ सोडियम सायनाईड हे विषारी द्रव्य सापडल्यामुळे ३ किमी अंतरातील लोकांना दूर हलविण्यास सुरुवात करण्यात आली. तिआंजिन बंदरामध्ये बुधवारी रात्री एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याचे झिन्हुआ वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे.
चिनी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ७०० व्यक्तींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यातील ३३ व्यक्तींची स्थिती गंभीर आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग आणि पंतप्रधान ली. केकीयांग यांनी या स्फोटांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोडियम सायनाइड काय असते ? सोडियम सायनाईडमुळे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जात आहे. सोडियम सायनाईड हे द्रव्य स्फटिकरूपात असते. ते वायू किंवा पाण्यात मिसळल्यास त्याचा मनुष्यास त्रास होतो. श्वसनावाटे किंवा शरीरात कोणत्याही मार्गाने हे द्रव्य गेल्यास आॅक्सिजन घेण्यास त्रास होऊ लागतो आणि मृत्यू ओढावतो.
स्फोटाबद्दल... तिआंजिन बंदरामधील रिउहाई लॉजिस्टिक्सच्या गोदामामध्ये (वेअरहाउस) दोन शक्तिशाली स्फोट झाले. दरवर्षी १० लाख कंटेनरची वाहतूक होणाऱ्या या बंदरामधील माल या स्फोटांमुळे नष्ट झाला. या स्फोटांच्या धक्क्याची तीव्रता इतकी होती, की त्याचे धक्के कित्येक किमी लांबवर जाणवले. स्फोटामुळे निर्यातीसाठी आणलेल्या हजारो कार्स अक्षरश: काडेपेट्यांप्रमाणे हवेत उडाल्या. रेनॉल्ट कंपनीने आपल्या १,५०० गाड्यांचे तर ह्युंडाईने ४,००० गाड्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
तिआंजिनचे
महत्त्व :
तिआंजिनचा चीनच्या व्यापारामध्ये मोठा वाटा आहे. वर्ल्ड शिपिंग कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, तिआंजिनचा कंटेनर्सच्या संख्येनुसार जगात १०वा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे रॉटरडॅम, हॅम्बुर्ग आणि लॉस एंजल्सपेक्षा त्याची क्षमता जास्त आहे. चीन या बंदरातून धातू, कच्ची खनिजे, स्टील, कोळसा, चारचाकी गाड्या आणि कच्च्या तेलाची वाहतूक करतो. या स्फोटांमुळे तिआंजिनच्या व्यापारावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.